आश्चर्य ! गोठलेल्या पदावर चक्क ५५ कर्मचारी

By Admin | Updated: July 24, 2014 00:08 IST2014-07-23T23:35:07+5:302014-07-24T00:08:12+5:30

संजय तिपाले , बीड अस्तित्वातच नसलेल्या पदावर तब्बल ५५ जण कार्यरत आहेत़ वाचून धक्का बसेल; पण हा आश्चर्यजनक प्रकार जिल्हा परिषदेत उघडकीस आला आहे़

Surprise! About 55 employees in the frozen position | आश्चर्य ! गोठलेल्या पदावर चक्क ५५ कर्मचारी

आश्चर्य ! गोठलेल्या पदावर चक्क ५५ कर्मचारी

संजय तिपाले , बीड
अस्तित्वातच नसलेल्या पदावर तब्बल ५५ जण कार्यरत आहेत़ वाचून धक्का बसेल; पण हा आश्चर्यजनक प्रकार जिल्हा परिषदेत उघडकीस आला आहे़ आरेखक या गोठलेल्या पदावरील कर्मचाऱ्यांना इतर संवर्गातील पदावर सामावून न घेतल्याने हा सारा प्रकार घडला आहे़ उल्लेखनीय म्हणजे, आरेखकांना कुठलेच काम नाही; पण महिन्याकाठी ‘दाम’ मात्र न चुकता मिळतो़
पूर्वी बांधकाम विभागात आरेखक हे पद अस्तित्वात होते़ त्याखालोखाल कनिष्ठ आरेखक व अनुरेखक ही पदे होती़ लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही ही पदे होती; पण या पदांची आस्थापना बांधकाम विभागातच असायची़ ही सर्व पदे तांत्रिकमध्ये मोडतात़ पाटबंधारे, विहिरी, रस्ते, पूल यांचे नकाशे तयार करुन त्याप्रमाणे कामे होत असत; पण ५ आॅगस्ट २००३ रोजी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने स्था़अ़स़ २००२/ प्रक़्ऱ ४२१/ आस्था- ९ या आदेशाद्वारे अनुरेखक हे पद गोठवून या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात करण्याचा अध्यादेश काढला़
या अध्यादेशाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने सर्व जि़प़ कडून अनुरेखक पदावर किती कर्मचारी कार्यरत आहेत? याची माहिती मागविली होती़ शिवाय त्यांचा समावेश स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात कसा करायचा? याची नियमावली देखील घालून दिली होती; पण बीड जि़प़ मध्ये मात्र, अजूनही तब्बल ५५ कर्मचारी अनुरेखक व त्या संवर्गातील इतर पदांवर कार्यरत आहेत़ ३ आरेखक, १४ कनिष्ठ आरेखक व ३८ अनुरेखकांचा त्यात समावेश आहे़
माहिती मागवितो- भारती
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती म्हणाले, गोठलेल्या पदांवर कर्मचारी कार्यरत असतील तर त्यांचा इतर संवर्गात समावेश केला जाईल़ आरेखक पदावरील कर्मचाऱ्यांचा इतर संवर्गातील समावेश का राहिला? याची माहिती घ्यावी लागेल़ या संदर्भातील ‘डिटेल्स’ मागवून घेतो़ त्यानंतर यात नेमकी काय अडचण आहे हे पाहून उपाययोजना कराव्या लागतील, असेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले़
ब्ल्यूप्रिंटच्या जागी संगणक आल्याने कामच उरले नाही
आरेखक ते अनुरेखकांपर्यंत या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वी नकाशे, मोजमाप तयार करावे लागायचे़ त्यासाठी बीड जि़प़ च्या बांधकाम विभाग व लघुपाटबंधारे विभागात प्रत्येकी एक ब्ल्यू प्रिंट यंत्र उपलब्ध होते़ त्यावर हे कर्मचारी काम करत़ १९८५ मध्येच ब्ल्यूप्रिंट यंत्र बंद पडले़ त्यानंतर संगणक आले़ आरेखक, कनिष्ठ आरेखक, अनुरेखक या पदांवरील कर्मचाऱ्यांना कामच उरलेले नाही़ त्यामुळेच शासनाने २००३ मध्ये अनूरेखक पद गोठवून त्या कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेतला़
शासनादेश डावलला
अनुरेखक संवर्गातील कर्मचाऱ्याचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गातील पदावर समावेश करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी ११ वर्षांपासून झालेली नाही़ जि़प़़ ला़ त्याचा विसर पडल्याने अनुरेखक, कनिष्ठ आरेखक व आरेखक या संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलेही काम राहिलेले नाही़

Web Title: Surprise! About 55 employees in the frozen position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.