छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख रस्ते स्मार्ट सिटीमार्फत तयार करण्यात येत आहेत. यातील काही रस्त्यांचा सरफेस (पृष्ठभाग) खराब असल्याचे समोर आले. स्मार्ट सिटीने जेवढा पॅच खराब, तेवढा परत नव्याने करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. त्यामुळे काही रस्ते परत फोडण्याची नामुष्की कंत्राटदारावर ओढवली. नवीन रस्ता फोडल्याने नागरिकांनाही आश्चर्य वाटू लागले आहे. आतापर्यंत १० ठिकाणी रस्ते फोडण्यात आले, हे विशेष.
३१७ कोटी रु. खर्च करून स्मार्ट सिटीमार्फत शहरातील १११ रस्ते गुळगुळीत करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक रस्त्यांचे काम पूर्ण झाले. रस्ता तयार केल्यानंतर काही दिवसातच ‘सरफेस’ खराब होऊ लागला. त्यामुळे तेथील भाग खोदून पुन्हा रस्ता नव्याने तयार करून द्यावा, असे आदेश स्मार्ट सिटीने कंत्राटदाराला दिले. एक महिना, दोन महिन्यांपूर्वी गुळगुळीत केलेला रस्ता अचानक ब्रेकरने फोडण्यात येत असल्याने नागरिकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
१० वर्षांची जबाबदारी१) स्मार्ट सिटीने १११ रस्त्यांसाठी निविदा प्रसिद्ध करताना एक अट त्यात टाकली होती. रस्ते तयार केल्यानंतर तब्बल १० वर्षे देखभाल दुरुस्ती ही संबंधित कंत्राटदाराकडे राहील.२) पुढील दहा वर्षांत स्मार्ट सिटीचा रस्ता किंचितही खराब झाला तर कंत्राटदाराला तो तयार करून द्यावाच लागणार आहे. कंत्राटदार जबाबदारी झटकू शकत नाही.३) कंत्राटदाराने भविष्यात नकार देऊ नये म्हणून त्याची काही रक्कम अनामत स्वरूपात ठेवली जाणार आहे.
कुठे-कुठे रोड फोडले?मनपा मुख्यालय ते बुढ्ढीलेनपर्यंत दोन ठिकाणी, जामा मशीद ते मनपा मुख्यालय एका ठिकाणी, जवाहरनगर ते रोपळेकर हॉस्पिटल एका ठिकाणी, एन-७ देवगिरी बँकेसमोर फोडण्यात आले. याशिवाय आणखी काही ठिकाणी फोडण्याचे आदेश दिले.
आयआयटी मुंबईचे लक्षरस्त्यांच्या गुणवत्तेसाठी प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) म्हणून आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञांची नेमणूक केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख इम्रान खान यांनी दिली.
मनपाने आदर्श घ्यावामनपातर्फेही शहरात १०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. याची गुणवत्ता मात्र तपासली जात नाही. सरफेस खराब झाला तरी बघितले जात नाही. भविष्यात रस्ता खराब झाला तर मनपाच्या कंत्राटदाराने दुरुस्त करून दिला, अशी उदाहरणे सापडणार नाहीत.