सुरज साळुंकेंची सेना-भाजपाला धोबीपछाड
By Admin | Updated: December 31, 2016 23:31 IST2016-12-31T23:30:37+5:302016-12-31T23:31:07+5:30
उस्मानाबाद :साळुंके यांनी भाजप-सेनेचे उमेदवार योगेश जाधव यांचा नऊ मतांनी पराभव केला.

सुरज साळुंकेंची सेना-भाजपाला धोबीपछाड
उस्मानाबाद : शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उठवित राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांची फौज शिवसेनेचे नगरसेवक सुरज साळुंके यांच्या पाठीशी उभी केल्याने सेना-भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला उपाध्यक्षपदाच्या पराभवाला सामोरे जावे लागले. साळुंके यांनी भाजप-सेनेचे उमेदवार योगेश जाधव यांचा नऊ मतांनी पराभव केला. त्यामुळे ही एकप्रकारे भाजपा शिवसेनेला मोठी चपराक मानली जात आहे.
पालिकेत सेना, भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. सेना-भाजपा युती करण्यासाठी दोन्ही पक्षात चर्चाही सुरु होती. परंतु, दोघांनीही उपाध्यक्षपदावर दावा ठोकल्याने युतीचा निर्णय शुक्रवारी सायंकाळपर्यंत झाला नव्हता. रात्री उशिरा निर्णय होवून उपाध्यक्षपद भाजपाला देण्याचा निर्णय झाला. मात्र काहीतरी वेगळ्याच घडामोडी घडण्याचे संकेत मिळत होते. शनिवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरूवात झाल्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे योगेश जाधव यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून अभय इंगळे यांनी अर्ज भरला. दरम्यान, ‘पक्षाने शब्द पाळला नाही’, असा आरोप करीत सेनेचे नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके हेही उपाध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले. साळुंके यांच्या उमेदवारीमुळे युतीच्या उमेदवार अडचणीत आल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंके यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपा पदाधिकारी, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, यांनी केला. वरिष्ठ नेत्यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे सर्व प्रयत्न निष्पळ ठरले. दरम्यान, नाराजीनाट्यावर नजर ठेवून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने साळुंके यांना मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपासह सेनेच्या नेत्यांची मध्यस्ती फोल ठरली. अखेरच्या दोन-तीन मिनिटात राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीने अभय इंगळे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार इंगळे यांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे उमेदवार योगेश जाधव आणि सुरज साळुंके यांच्यात थेट लढत झाली. दगाफटका होणार हे गृहित सर्व नगरसेवकांनी युतीचे उमेदवार योगेश जाधव यांना मतदान करावे, असा व्हीप बजावण्यात आला. परंतु, सेनेच्याच सहा नगरसेवकांनी व्हीप झुगारून साळुंके यांना मतदान केले. राष्ट्रवादीच्या १७ नगरसेवकांनीही आदेशाप्रमाणे साळुंके यांच्या पाठीशी ताकद उभी केली. एका अपक्षानेही साळुंके यांनाच मतदान केले. त्यामुळे साळुंके यांच्या पारड्यात २४ तर योगेश जाधव यांच्या खात्यात भाजपा सात, सेना पाच, काँग्रेस दोन आणि नगराध्यक्षाचे एक अशी १५ मते पडली. निवडीनंतर सुरज साळुंके यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.