महिलांच्या व्यथा ऐकून गहिवरल्या सुप्रिया सुळे !
By Admin | Updated: May 22, 2017 23:45 IST2017-05-22T23:41:27+5:302017-05-22T23:45:37+5:30
लातूर :एक लाख रुपये हुंडा देऊन विवाह केला़ आता दीड तोळे सोने देणे शिल्लक आहे, अशी व्यथा दहिटणा येथील पुष्पा कुडके यांनी मांडल्यानंतर ती ऐकून खासदार सुप्रिया सुळेही सोमवारी थक्क झाल्या़

महिलांच्या व्यथा ऐकून गहिवरल्या सुप्रिया सुळे !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मॅडम, मुलीचा विवाह ठरला, तारीखही काढली़ त्यासाठी पैश्याची जमवाजमव सुरु झाली़ परंतु, पैसे जमत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या पतीने विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविली़ त्यामुळे कुटुंब दु:खात होते़ परंतु, मुलीचा विवाह तोंडावर आल्याने पै- पाहुण्यांच्या मदतीने जावयास एक लाख रुपये हुंडा देऊन विवाह केला़ आता दीड तोळे सोने देणे शिल्लक आहे, अशी व्यथा दहिटणा येथील पुष्पा कुडके यांनी मांडल्यानंतर ती ऐकून खासदार सुप्रिया सुळेही सोमवारी थक्क झाल्या़
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील मयुरा हॉटेल येथे उमेद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ यावेळी जीवनराव गोरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, प्रदीप साळुंके, बसवराज पाटील नागराळकर, मकरंद सावे, पप्पू कुलकर्णी, भाग्यश्री क्षीरसागर आदींची उपस्थिती होती़
दहिटणा येथील कुडके यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर खा़ सुळे म्हणाल्या, मुलीच्या विवाहासाठी हुंडा द्यायचा नाही़ जावयाचे दीड तोळे सोने देऊ नका़ तो मागणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ, असे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या़ यावेळी त्यांनी जिल्ह्यातील २४ विधवा महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या़ शेवटी आभार अॅड़ वसंत उगिले यांनी मानले़