शेतकऱ्यांना पाठिंब्याच्या स्वतंत्र छावण्या
By Admin | Updated: June 6, 2017 00:56 IST2017-06-06T00:53:10+5:302017-06-06T00:56:10+5:30
औरंगाबाद: शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात पाठिंबा मिळाला

शेतकऱ्यांना पाठिंब्याच्या स्वतंत्र छावण्या
औरंगाबाद: शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात पाठिंबा मिळाला मात्र शहरात पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. बंदचा दूधसंकलनावरही परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. शहरात सध्यातरी दुधाची टंचाई जाणवत नसल्याचे दिसत आहे.
टी. व्ही. सेंटर, पुंडलिकनगरात स्वयंस्फूर्त प्रतिसाद
शहरातील टी. व्ही. सेंटर, पुंडलिकनगर भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून संपात स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या भागातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती. तर शहरातील मुख्य भाग असलेल्या गुलमंडी, टिळकपथ, शहागंज, फुलेमंडई, निराला बाजार आदी भागांत संपाचा परिणाम जाणवला नाही. याठिकाणी सर्व व्यवहार सुरूळीतपणे सुरू होते.
दूध संकलन अर्ध्यावर
जिल्ह्यात शासकीय दूध योजना, सहकारी संघ आणि खाजगी व्यक्तीमार्फ त दुधाचे संकलन आणि वितरण केले जाते. सोमवारच्या महाराष्ट्र बंदमुळे दूध संकलन ५० टक्केही होऊ शकले नाही. सरासरी ९० हजार लिटर दुधाचे संकलन होत असताना सोमवारी हे संकलन ३७ ते ४० हजार लिटरदरम्यान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालेभाज्या तेजीत
शेतकरी संपामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत घटलेली पालेभाज्यांची आवक रविवारी वाढली होती. सुमारे १८०० क्विंटल फळे व पालेभाज्यांची आवक झाली. यात मेथी, पालक, मिरची, वांगे, टोमॅटो, बटाटे, कोथींबिरीचा समावेश होता. मात्र, सोमवारच्या बंदमुळे पालेभाज्यांची आवक पुन्हा घटल्याने भाज्यांचे दर तेजीत आले.
पालेभाज्यांची टंचाई निर्माण झाल्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रीचे दर दुप्पट, तिप्पट झाले. सिडको, हडको, औरंगपुरा, शिवाजीनगर परिसरातील सर्वच भाजीपाला विक्रे त्यांना जाधववाडीत भाजीपाला मिळत नसल्याने दर वाढल्याचे सावता भाजीपाला केंद्राचे संचालक जनार्दन जाधव यांनी सांगितले.