पीक विम्याने दिला शेतकऱ्यांना आधार
By Admin | Updated: July 14, 2016 01:02 IST2016-07-14T00:44:21+5:302016-07-14T01:02:05+5:30
उस्मानाबाद : खरीप पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांना मोठा आधार लाभला आहे. ऐन पेरणीच्या काळात युध्दपातळीवर यंत्रणा राबवून

पीक विम्याने दिला शेतकऱ्यांना आधार
उस्मानाबाद : खरीप पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांना मोठा आधार लाभला आहे. ऐन पेरणीच्या काळात युध्दपातळीवर यंत्रणा राबवून ४५५ कोटींपैकी ४१९.७२ कोटींच्या नुकसान भरपाईच्या रकमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात जिल्हा बँकेला यश आले आहे.
मागील तीन वर्षांपासून जिल्हा तीव्र दुष्काळाचा सामना करीत होता. दरम्यान, खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई जाहीर होवून यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विक्रमी म्हणजे ४५५ कोटींची रक्कम मंजूर झाली होती. सदर रक्कम तातडीने वितरित करण्याचे जिल्हा बँकेसमोर आव्हान होते. राजकीय पक्षांनीही पीक विमा रकमेच्या वितरणाचा मुद्दा ऐरणीवर घेतलेला होता. या अनुषंगाने विविध आरोप-प्रत्यारोप होत असतानाच जिल्हा बँक मात्र पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीने वितरित करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द यंत्रणा राबवित होती. विमा वाटपाच्या रकमा प्राप्त झाल्यापासून याद्या तयार करणे व त्या खात्यावर रकमा जमा केल्यानंतर अवघ्या २४ बँक कामकाजाच्या दिवसात जिल्हा बँकेने ४१९.७२ कोटींची म्हणजेच एकूण रकमेच्या सुमारे ९३ टक्के रक्क़म वाटप केली. पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमा शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळी हातात पडल्याने पेरणीसाठी बी-बियाणे तसेच इतर आवश्यक साहित्याची खरेदी करणे शक्य झाले. विरोधक विमा वाटपावरून आरोप करीत असताना जिल्हा बँकेचे पदाधिकारी तसेच कर्मचारी दिवसरात्र काम करीत राहिले. यामुळेच हे शक्य झाल्याचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)