पुरवणी परीक्षेतही ‘कॉपी’लाच प्राधान्य!
By Admin | Updated: July 13, 2016 00:40 IST2016-07-13T00:19:35+5:302016-07-13T00:40:38+5:30
औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले.

पुरवणी परीक्षेतही ‘कॉपी’लाच प्राधान्य!
औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. कारवाई करण्यात आलेले हे तिघेही कॉपीबहाद्दर जालना जिल्ह्यातील परीक्षार्थी आहेत. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ८ हजार २१० विद्यार्थ्यांनी आज इंग्रजी विषयाची पुरवणी परीक्षा दिली.
तथापि, ९ जुलैपासून सुरू झालेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने दोन भरारी पथके तैनात केली आहे. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांमध्ये ८ हजार २१० विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली. भरारी पथकाने जालना जिल्ह्यातील काही शाळांवर लक्ष केंद्रित केले तेव्हा तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये झालेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा जालना जिल्ह्यात झाल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या परीक्षेतही ‘बोर्डा’ने जालना जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येते.
काल बारावीच्या परीक्षेतील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. विवेकानंद महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थिनीला इंग्रजी माध्यमाचा संस्कृत विषयाचा पेपर देण्याऐवजी मराठी माध्यमाचा पेपर दिला. विद्यार्थिनीने पेपर बदलून मागितला तेव्हा संबंधित पर्यवेक्षकाने कस्टोडियन देशमुख यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी देशमुख यांनी दोन्ही माध्यमांसाठी एकच पेपर असतो, असे सांगून वेळ मारून नेली. देशमुख यांच्या अशा दुर्लक्षितपणामुळे त्या विद्यार्थिनीला शेवटपर्यंत संस्कृत विषयाचा पेपर बदलून मिळालाच नाही.