सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटचा संचालक पारखेचा जामीन अर्ज मागे
By Admin | Updated: January 13, 2017 21:10 IST2017-01-13T21:10:06+5:302017-01-13T21:10:06+5:30
दामदुप्पट परताव्याचे आमीष दाखवून राज्यभरात अनेकांची फसवणूक करणा-या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया, या कंपनीचा संचालक दीपक केडू पारखे

सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटचा संचालक पारखेचा जामीन अर्ज मागे
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13- दामदुप्पट परताव्याचे आमीष दाखवून राज्यभरात अनेकांची फसवणूक करणा-या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया, या कंपनीचा संचालक दीपक केडू पारखे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला नियमित जामीन अर्ज मागे घेतला .
दीपक पारखे व त्याची पत्नी दिव्या ( वय ३२, दोघे रा. मगरपट्टा, पुणे) हे सध्या हर्सूल कारागृहात आहेत .या संचालक दाम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. दामदुप्पट परताव्यासह कंपनीला सभासद मिळवून दिल्यास परदेश वारीचे आमिषही दाखविण्यात आले होते. आरोपींनी १६ जुलै २०११ रोजी या कंपनीची स्थापना केली होती. जालना रोडवरील घई कॉम्प्लेक्स भागात कंपनीचे मुख्यालय, तर सिंधी कॉलनीत मुख्य शाखा सुरू केली. एक रकमी गुंतवणूक केल्यास आकर्षक मासिक उत्पन्न व त्यासोबतच विविध बक्षिसे, अधिक सभासद केल्यास कार, लॅपटॉप, परदेशी सहल अशी आमिषे दाखविण्यात आली होती. या प्रकरणी जाहिरातबाजी करतानाच, या कंपनीने राज्यभरातून सभासद केले होते. साखळी पद्धतीमुळे सभासदांची संख्या वाढत होती. प्राथमिक माहितीनुसार कंपनीने मराठवाड्यासह राज्यभरात नऊ हजार सभासद केले असून सुमारे ७० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. या कंपनीचे संचालक असलेल्या शिवाजी पोळ (वय ५०, रा. दिग्रस, जि. परभणी), सतीश पोळ, शेषराव घुले, प्रधान आडे, हरिष साळवे यांच्याविरुद्धही जवाहरनगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेडगाव परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथील नंदा बळीराम पाटील (वय ५०) यांनी २०१२-१३ मध्ये तीन लाख रुपये गुंतविले. यातून दरमहा २० हजार रुपये परतावा मिळणा-या योजनेत त्यांची गुंतवणूक होती. आमिषाला बळी पडून त्यांनी वडील, भाऊ तसेच बहीण अशा नातेवाइकांनाही कंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडले. त्यांचे एकूण २० लाख ८५ हजार रुपये या कंपनीमध्ये गुंतले आहेत.जानेवारी २०१४पासून त्यांना परतावा मिळाललेला नाही. दीपक पारखे याने नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता . परंतु जामीन मिळत नाही हे लक्षात येताच पारखे याने अर्ज मागे घेतला.सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुरेश मुंडे यांनी बाजू मांडली.