मतदान टक्केवारी वाढीसाठी सुपर संडे
By Admin | Updated: August 31, 2014 00:13 IST2014-08-31T00:05:43+5:302014-08-31T00:13:38+5:30
नांदेड: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुपर संडे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले़

मतदान टक्केवारी वाढीसाठी सुपर संडे
नांदेड: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले़
नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा शनिवारी डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केली होती़ यावेळी ते बोलत होते़
कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत देशमुख, तहसीलदार महादेव किरवले यांची उपस्थिती होती़ स्वामी म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढू शकते़ त्यामुळे मतदार जागृतीमध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे़ दोन्ही मतदार -संघातील मतदानाच्या टक्केवारी आणि कामगिरीचे प्रतिबिंब जिल्ह्याच्या निवडणुकीत उमटत असते़ त्यामुळे या मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क आणि सक्रियपणे काम करणे अपेक्षित आहे़
मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याचा प्रयत्न अनेक स्तरावरून करण्यात येत आहे़ पण लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांची अद्ययावतीकरण आणि त्यातून मतदारांपर्यंत जागृती करून, मतदानाची टक्केवारीत वाढ करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे़ त्यामुळे रविवारी ३१ आॅगस्ट रोजी भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यात नाव समाविष्ट करणे, किंवा फोटो नसेल तर फोटो तसेच अन्य नोंदी अद्ययावत करण्यासाठी सुपर संडेची संधी देण्यात येत आहे़ त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविणे अपेक्षित आहे़
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांतील आपल्या नावाची खात्री करून घेऊन, तपशील, फोटो याबाबत अद्ययावत करण्यासाठी सूपर संडे या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)