‘सुपर पॉवर’ कंपनीने गंडविले
By Admin | Updated: August 2, 2014 01:42 IST2014-08-02T00:30:12+5:302014-08-02T01:42:58+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केबीसी मल्टीट्रेड कंपनीपाठोपाठ ‘सुपर पॉवर’कडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.
‘सुपर पॉवर’ कंपनीने गंडविले
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केबीसी मल्टीट्रेड कंपनीपाठोपाठ ‘सुपर पॉवर’कडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. डिग्रस कऱ्हाळे येथे जवळपास एक कोटीची गुंतवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर औंढा तालुक्यातील लाख येथील १५ जणांना या कंपनीने गंडविल्याची तक्रार आहे.
लाख येथील काही ग्रामस्थांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांना भेटून ‘सुपर पॉवर’ कंपनीकडून फसवणूक झाल्याचे सांगितले. यावेळी राकाँचे मनिष आखरे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे उपस्थित होते.
यासंदर्भात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झालेला असल्याने गुंतवणूकदारांनी थेट त्याच ठिकाणी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, अशा सूचना सुचना दाभाडे यांनी दिल्या. लाख येथील विश्वनाथ लोंढे, संभाजी लोंढे, विठ्ठल लोंढे, ज्ञानेश्वर बाबूराव लोंढे, प्रल्हाद चव्हाण इत्यादी १५ जणांनी २० लाख रूपये ‘सुपर पॉवर’मध्ये गुंतवले असून कंपनीने त्यांना पुढील तारखेचे धनादेश दिले आहेत.
या गुंतवणूकदारांनी पैसे औरंगाबाद येथेच भरलेले असल्याने त्यांना तिकडे तक्रारी नोंदवण्यास सांगण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्ांकर सिटीकर यांनी दिली. तसेच लाख येथील गुंतवणूकदारांना मूळ कागदपत्रे व कंपनीने दिलेले धनादेश घेऊन शनिवारी येण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर आणखी काही तक्रारदार समोर येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. केबीसीतही एकापाठोपाठ तक्रारदार पुढे येत होते. (प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी गुन्हा
हट्टा : वसमत तालुक्यातील आडगाव येथे प्लॉटच्या कारणावरून बालासाहेब वैद्य यांना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी राम ज्ञानोबा वैद्य याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना हेेंद्रे करीत आहेत.
केबीसीची चौकशीही संथ
केबीसी प्रकरणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. मात्र त्यातील अनेकजण समोर आले नाहीत. जे समोर आले त्यांनाही पोलिसांच्या संथपणाचा अनुभव येत आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात केवळ जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचेच सांगितले जाते. मात्र त्यानंतर नेमके काय करणार याचा पत्ता नाही. यामुळेच की काय सुपर पॉवर प्रकरणातही लोक फारसे पुढे यायला तयार होत नाहीत. त्यामुळे पोलिसांना तो विश्वास निर्माण करावा लागणार आहे.