प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम
By Admin | Updated: August 8, 2014 00:32 IST2014-08-08T00:10:01+5:302014-08-08T00:32:22+5:30
उस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे

प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम
प्रत्येक गावात आता ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम
उस्मानाबाद : ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसतो. त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. या अनुषंगानेच जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात ‘संडे सर्व्हीस’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात निर्मल भारत अभियान कक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे राज्य सदस्य भारत पाटील, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी तांबे, रूपाली सातपुते, इसूफ कबीर, डॉ. शीतलकुमार मुकणे आदींची उपस्थिती होती.
‘संडे सर्व्हीस’ उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत एकत्रित येऊन गावातील समस्यांसंदर्भात चर्चा करावयाची आहे. तसेच त्यावर उपाययोजनाही शोधायच्या आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून वैयक्तीक शौचालय बांधकाम, परिसर स्वच्छता, पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेसाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जी गावे एकजुटीने या उपक्रमात सहभागी होतील, त्या गावांच्या विकासाला गती मिळेल. अशा गावांत विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी गावानेच एकत्र येऊन विकास आराखडा तयार करण्याची गरज असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले. (प्रतिनिधी)
प्रत्येक नागरिकांचे जसे अधिकार आहेत तसे कर्तव्येही आहेत. त्यामुळे अधिकार मागताना कर्तव्यही बजावले पाहिजे, असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, सध्या जिल्ह्यात केवळ ३६ टक्के एवढी वैयक्तीक शौचालयांची संख्या आहेत. आपला जिल्हा निर्मल होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे.
यापुढील काळात निवेदने घेऊन जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या विविध संघटना, मित्रमंडळे आणि नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत का, त्यांनी आपापल्या गावात वृक्षलागवड केली आहे काय, याचीही माहिती घेतली जाणार आहे. यासाठी खास मित्रमंडळ डायरी तयार करण्यात येऊन या गोष्टीचाही पाठपुरावा केला जाणार आहे.