रविवार बाजारातील गर्दी ओसरली
By Admin | Updated: October 6, 2014 00:41 IST2014-10-06T00:16:23+5:302014-10-06T00:41:56+5:30
औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती.

रविवार बाजारातील गर्दी ओसरली
औरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडी बाजारातील गर्दी रविवारी ओसरली होती. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरूअसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. त्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने आलेले ग्राहकही पांगले. याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला.
भाजीपाल्यापासून ते टीव्हीपर्यंत सबकुछ जिथे मिळते, त्या मोंढ्यातील जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या बाजाराची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. दर रविवारी विक्रेते व ग्राहक यांची येथे एवढी गर्दी होते की, परिसरात पायी चालणेही कठीण होऊन जाते.
लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या आठवडी बाजारात आज मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. सकाळपासूनच या परिसरात तुरळक ग्राहकी दिसून आली. दुपारनंतर गर्दी वाढत असते; पण तसे झाले नाही. रविवारी या बाजारातून पायी चालणे कठीण असते; पण आज अनेक जण वाहन घेऊन थेट येथे आले होते. वर्दळच नसल्याने वाहतूक जाम होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात दुपारी ४ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी, बाजारात असलेली ग्राहकीही पांगली. यामुळे अनेकांनी सायंकाळ होण्याच्या आतच गाशा गुंडाळला. भाजी विक्रेते हरिभाऊ जोगदंड यांनी सांगितले की, आज ९०० रुपयांची भाजी विक्रीसाठी आणली होती.
सायंकाळपर्यंत सर्व भाजी विक्री होत असते. मात्र, आज ३४० रुपयांचाच धंदा झाला. कटलरीचे साहित्य विकणारे शेख मोहंमद म्हणाले की, निवडणुकीचा परिणाम बाजारावर दिसून आला. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकी हमाल, कष्टकरी नागरिक आज दिसलेच नाहीत. अनेक जण निवडणूक प्रचारात काम करीत असल्याचे कळाले.
नईम पठाण या ग्राहकाने सांगितले की, दर आठवडी बाजारात भाजी व अन्य साहित्य खरेदीसाठी येथे येत असतो. मात्र, आज गर्दी
कमी असल्याचे आढळून आले.
एरव्ही धक्के खात येथून जावे
लागत असे; परंतु आज मोकळे फिरून आम्ही भाज्या व अन्य साहित्य खरेदी केले.