उन्हापासून असे आहेत धोके...

By Admin | Updated: April 14, 2016 23:45 IST2016-04-14T23:44:16+5:302016-04-14T23:45:58+5:30

बीड : एप्रिलच्या मध्यावर उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. सकाळी नऊ वाजेनंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचे असह्य चटके बसू लागले आहेत

From the sun, there are such dangers ... | उन्हापासून असे आहेत धोके...

उन्हापासून असे आहेत धोके...



बीड : एप्रिलच्या मध्यावर उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. सकाळी नऊ वाजेनंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचे असह्य चटके बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या जीवाची अक्षरश: लाहीलाही होऊ लागली आहे. बुधवारी बीड तालुक्यातील मंझेरी हवेली येथे एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. उन्हाची दाहकता जीवावर बेतू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गुरूवारी वैद्यकीय तज्ज्ञांशी बातचित केली. भरपूर पाणी व संतुलित आहार महत्त्वाचा असून, प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
गरोदर मातांनी घ्यावा संतुलित आहार
गरोदर मातांना उन्हाळ्यात सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाय करून संभाव्य धोके टाळावेत, असे सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. कविता वीर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. अशा काळात अशुद्ध पाणी पिल्याने गॅस्ट्रो, टायफाईड, मूतखडा, आतड्याचे आजार जडण्याची शक्यता अधिक असते. पोटातील पाणी कमी झाल्याने बाळाच्या जीवावर बेतू शकते किंवा वेळेआधी प्रसूती होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती कपडे घालावेत, पाणी उकळून थंड करून प्यावे, उन्हात काम करणे टाळावे, आहारात रसयुक्त फळे, ताकाचा समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असेही त्या म्हणाल्या.
आयुर्वेदिक उपचार उपायकारक
उन्हाळ्यात आयुर्वेदिक उपचार उपायकारक असल्याचा दावा आयुर्वेदाचार्य डॉ. शिवप्रसाद चरखा यांनी केला. ते म्हणाले, उन्हाचा त्रास जाणवल्यास तळपायाला कांदा चोळून लावावा, डोळ्यावर काकडी कापून ठेवावी, लिंबू, नारळपाणी प्यावे, चंदनाची उटी कपाळाला लावावी, चंदनाचा गंध उगाळून दोन चमचे घ्यावा, आवळा चूर्ण, गुलकंद घ्यावे त्यामुळे उन्हाची दाहकता कमी होते. आहारात ताकाचे प्रमाण वाढवून टरबूज, कलिंगडे अशी फळे भरपूर खावीत. दोन वेळा आंघोळ करावी, चहा - कॉफी, बाजरी, मसाल्याचे पदार्थ या काळात वर्ज्य करावेत. रात्रीच्या जेवणात दूध व भाकरी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी सूचवला.
लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक
सर्वसाधारणत: उन्हाळ्यात लहान मुलांना उष्माघात होऊ शकतो. चक्कर येणे, हातपाय दुखणे, खूप तहान लागणे, खूप कडक ताप येणे, लघवी कमी होणे अशी उष्माघाताची सर्वसाधारण लक्षणे आहेत. प्रमाणपेक्षा अधिक म्हणजे १०५ अंश फॅनरहीटपेक्षा अधिक ताप आल्यास लहान मुलांचा जीवही जाऊ शकतो. यासह उष्णतेमुळे लहान मुलांच्या अंगावर पुरूळ उठणे, घामोळ्या येणे, असे त्वचेचे आजार देखील जडू शकतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक ठरते. लहान मुलांना उन्हात जाऊ न देणे, गेला तरी त्याच्या अंगावर सुती कपडे घालून बाहेर पाठवावे, डोक्याला ऊन लागू नये यासाठी टोपी घालावी, थोड्या थोड्या वेळाने मुलांना पाणी देत रहावे, वरील काही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेतल्यास उन्हापासून होणाऱ्या आजारांना टाळता येऊ शकते, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उन्हामुळे वेगवेगळ्या वयोगटात होणारे धोके एकच आहेत. चक्कर येणे, अशक्तपणा, हातपायांना मुंग्या येणे ही सर्वसाधारण लक्षणे आहेत.
४वयोवृद्धांना धाप लागणे, लहान मुलांना गॅस्ट्रो, टायफाईडचा धोका असतो. गरोदर मातांच्या पोटातील पाणी कमी होऊन अवेळी प्रसुती होण्याची शक्यता असते.
जनरल सर्जन डॉ. अनिल सानप म्हणाले, वाढत्या उन्हापासून बचावासाठी सर्वच वयोगटातील मंडळींनी सोपे, सहज उपाय करावेत. भरपूर पाणी प्यावे, उन्हाच्या वेळा टाळून बाहेरची कामे उरकावीत, तोंड, हातपाय थंड पाण्याने धुवावेत, सुती कपडे, टोपी, गमछे वापरावेत, भरपूर पाणी प्यावे, भोवळ येणे, अशक्तपणा असा त्रास झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. तंतुयुक्त आहार व फळांचे सेवन केल्यास उष्माघातापासून दूर राहता येईल.
उन्हाळ्यात अती उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर घामावाटे शरीरातील पाणी बाहेर जाते. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक सोडिअम, पोटॅशिअम सारखे महत्त्वपूर्ण घटक बाहेर पडतात. उष्णता सहन न झाल्याने मळमळ, चक्कर येणे, डोळे दुखणे अशी लक्षणे दिसतात. मीठ-साखर पाणी घेतल्यास लगेच बरे वाटते. नॅट्रमकार्ब सेलेनियम कोलोसिन्थ यासारखी होमिओपॅथिक औषधे उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सचिन वारे म्हणाले.

Web Title: From the sun, there are such dangers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.