स्मशानभूमीत घुमले सनईचे सूर...!
By Admin | Updated: December 31, 2015 13:13 IST2015-12-30T00:35:45+5:302015-12-31T13:13:30+5:30
संजय तिपाले , बीड आक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे

स्मशानभूमीत घुमले सनईचे सूर...!
संजय तिपाले , बीड
आक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे पूर्णविराम मिळतो तेथेच रेणुका गायकवाड आणि गंगाराम जाधव यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली.
रेणुका व गंगाराम यांचे लग्न येथील अमरधाम स्मशानभूमीत रितीरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडले. स्मशानभूमीत हा लग्नसोहळा पार पडला असला तरी तो एखाद्या मंगल कार्यालयातील लग्नसमारंभासारखाच होता. इतर वेळी स्मशानभूमीत पाऊल ठेवताना प्रत्येकजण दु:खी अंतकरणाने येतो; परंतु मंगळवारचे चित्र याहून वेगळेच होते. लक्ष्मण गायकवाड व पार्वती गायकवाड हे दाम्पत्य मागील दहा वर्षांपासून स्मशानभूमीत वास्तव्यास आहे. मूळचे औरंगाबाद येथील गायकवाड दाम्पत्यास एक मुलगी व दोन मुले आहेत. कन्या रेणुका ही उपवर झाल्याने तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले अन् हा शोध गंगाराम सूर्यभान जाधव (रा. शिरूर घोडनदी, जि. अहमदनगर) या तरूणाजवळ येऊन थांबला. मंगळवारचा मुहूर्त ठरला. रेणुका १० वी तर गंगाराम १२ वी उत्तीर्ण आहे. तो देखील आई-वडिलांसमवेत स्मशानभूमीतच राहतो.
विवाह स्थळासाठी दोन्हीकडील मंडळींनी स्मशानभूमीलाच होकार दिला. त्यानुसार शामियाना उभारण्यापासून ते वऱ्हाडींच्या पंगतीपर्यंतची तयारी जोरदार झाली. वऱ्हाडींसाठी पुरीभाजी, जिलेबी, मसाला भात, भजे असा खास बेत होता. देवाब्राह्मणांच्या साक्षीने दुपारच्या मुहूर्तावर हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी रेणुकाचे मामा चंदू इरेवार यांच्यासह लक्ष्मण घनसरवाड व इतर दिमतीला होते. नातेवाईकांसह २५० पाहुणे या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे गंगारामने हुंडा न घेता रेणुकाला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडले. वरपित्याने भांडीकुंडी व इतर संसारोपयोगी साहित्य दिले. नवरदेवाला आहेरही केला.
४गंगारामने सांगितले की आमची अख्खी हयात स्मशानभूमीत जाते. त्यामुळे येथे लग्न केले त्यात आश्चर्य काय ? असा प्रश्न उपस्थित करून या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे समर्थन केले. विवाहास मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होती.