छावणीत घुमले सनईचे सूर...

By Admin | Updated: April 18, 2016 00:58 IST2016-04-18T00:32:15+5:302016-04-18T00:58:30+5:30

बीड : गुरांच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या आवाजाच्या जोडीला सनईचे मंजूळ सूर, निवाऱ्यासाठी उभारलेल्या छपरालगतच मांडव, संगीताची मैफल, अत्तराचा सुगंधी दरवळ,

The sun shines in the camp ... | छावणीत घुमले सनईचे सूर...

छावणीत घुमले सनईचे सूर...


बीड : गुरांच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या आवाजाच्या जोडीला सनईचे मंजूळ सूर, निवाऱ्यासाठी उभारलेल्या छपरालगतच मांडव, संगीताची मैफल, अत्तराचा सुगंधी दरवळ, लाजरे बुजरे नवरदेव नवरी, वधू- वर पित्यांची धांदल, रखरखते ऊन अन् सगे, सोयरे- वऱ्हाडींच्या गर्दीने गजबजलेला परिसर अशा मराठमोळ्या वातावरणात रविवारी ४० जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. हा सामुदायिक विवाह सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी पालवण (ता. बीड) येथील चारा छावणीत मोठ्या दिमाखात पार पडला.
यशवंत सेवाभावी संस्था व लोकविकास मंचच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या मुला- मुलींसाठी अनावश्यक खर्च टाळत एकाच मांडवाखाली सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात आला. दुष्काळात पशुधनासाठी आधार ठरलेल्या छावणीत यानिमित्ताने मंगलध्वनी निनादला. या सोहळ्याची महिन्यापासून तयारी सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने प्रशासनही कामाला लागले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. विनायक मेटे, आ. प्रशांत बंब, डॉ. तात्यासाहेब लहाने, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, प्रकाश महाराज बोधले, नीलाराम जहागिरदार, बाबूराव पवार, महंत शिवाजी महाराज, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून उपस्थितांना दिलासा दिला. सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ राज्यात रूजली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी लग्नातील वैयक्तिक खर्चाला आळा बसतो, ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. आजच्या विवाह सोहळ्याला संत- महंतांची उपस्थिती आहे, त्यामुळे या जोडप्यांचे संसार सुखाचे होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकमेकांच्या सहाय्याने दुष्काळाचा मुकाबला करु. या संकटातून बाहेर पडू, असा आशावादही त्यांनी बोलून दाखविला.
आ. मेटे म्हणाले, मी स्वत: सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह केलेला आहे. सामुदायिक विवाह सोहळे आम्ही फक्त घेत नाही तर ते रुजविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचे विवाह येथे होत आहेत, त्यामुळे अशा कुटुंबांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसंग्रामच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यात राजकारणाला थारा नसतो, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त करुन मुंबईतील शंभर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निश्चय केला आहे. गरजूंनी संपर्क करण्याचे आवाहन केले. दुष्काळग्रस्तांसाठी आपण एका महिन्याचे वेतन दिल्याचा उल्लेख करुन त्यांनी मराठवाड्यात सामुदायिक विवाह सोहळ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रकाश महाराज बोधले यांनी शीघ्रकवितांमधून मुख्यमंत्री फडणवीस, आ. मेटे व राजेंद्र मस्के यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकला. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांचेही आशीर्वादपर भाषण झाले.
शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष व छावणी संचालक राजेंद्र मस्के यांनी प्रास्ताविक केले. छावण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाल्याचे सांगून त्यांनी संस्थेने सामुदायिक विवाह सोहळा घेतल्याने लग्नातील अनावश्यक खर्च वाचला आहे. यशस्वितेसाठी सुहास पाटील, अनिल घुमरे, मनोज जाधव, सतीश शेळके आदींनी परिश्रम घेतले.
संसारोपयोगी साहित्य
आयोजकांतर्फे नवदाम्पत्यांना कपाट, भांडी भेट म्हणून देण्यात आले. वऱ्हाडींसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी हजारो वऱ्हाडींनी पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. वऱ्हाडींसाठी पाण्याची सोयही होती. (प्रतिनिधी)
पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांच्यातील छुप्या राजकीय वैराची नेहमीच चर्चा होते. नारायणगडावरील कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नव्हते. त्यांच्या न येण्यामागे ‘राजकारण’ असल्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते. त्याचा धागा पकडत आ. मेटे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या विनंतीला मान देऊन आले. वेळ नसताना आले. अनेक अडचणी असताना आले, असा उल्लेख करून नामोल्लेख टाळत कळीच्या मुद्द्याला हात घातला. आपण येणार की नाही, याबाबत संभ्रम होता, शिवसंग्रामचे कार्यकर्ते व प्रशासनही संभ्रमात होते; परंतु आपण आलात आणि यापुढेही याल, असा विश्वास असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आपण शब्द पाळता, हा आपला लौकिक असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: The sun shines in the camp ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.