ऐन पावसाळ्यात सोसावा लागतोय उन्हाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST2017-09-13T01:03:11+5:302017-09-13T01:03:11+5:30

ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नसताना महावितरणनेदेखील अडचणींमध्ये भारनियमनाची भर घातली.

Summer in the rainy season! | ऐन पावसाळ्यात सोसावा लागतोय उन्हाळा!

ऐन पावसाळ्यात सोसावा लागतोय उन्हाळा!

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सप्टेंबर हा पावसाळा ऋतुतील तिसरा महिना; परंतु उकाडा उन्हाळ्याची अनुभूती देत आहे. ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नसताना महावितरणनेदेखील अडचणींमध्ये भारनियमनाची भर घातली.
भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील शहराचे तापमान सरासरी तापमानापेक्षा एक-दोन अंशांनी जास्त आहे. सामान्यपणे या काळात शहराचे तापमान ३० अंशांच्या आत आसपास असणे अपेक्षित आहे. मात्र, मागच्या सहा दिवसांमध्ये तापमानाने दररोज ३० अंशांची पातळी ओलांडली असून ७, १० आणि ११ सप्टेंबर या तीन दिवशी सर्वोच्च ३२.४ अंश तापमानाची नोंद आहे. ‘एवढी गरमी का होतेय’ असे वाटण्याचे हे कारण आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा आठवडा सूर्याचा असाच प्रकोप राहील. १८ सप्टेंबरपर्यंत पारा ३२ अंशांवर राहील. रविवारपर्यंत पाऊस जोरदार पडणार नसल्याचे भाकीतही करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता वाटत होती; परंतु मंगळवारी सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर तर गरमी जाणवू लागली. ही गरमी उन्हाळ्याची आठवण करून देणारी होती. ४० अंशांच्या उन्हामध्ये शहर चांगलेच भाजून निघाले होते. पावसाळ्यात तरी यापासून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षादेखील फोल ठरत आहे.

Web Title: Summer in the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.