माजलगाव उपनगराध्यक्षपदी सुमन मुंडे
By Admin | Updated: January 6, 2017 00:13 IST2017-01-06T00:11:11+5:302017-01-06T00:13:43+5:30
माजलगाव : नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बुधवारी भाजपच्या सुमन मुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

माजलगाव उपनगराध्यक्षपदी सुमन मुंडे
माजलगाव : नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बुधवारी भाजपच्या सुमन मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून दोघांना व राकाँकडून एकास संधी मिळाली.
बुधवारी नूतन नगराध्यक्ष सहाल चाउस यांनी पालिका सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा बोलावली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले. राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा जनविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरवून ठेवण्यासाठी नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. परिणामी सुमन मुंडे यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना निष्ठेचे फळ मिळाल्याची चर्चा पालिका परिसरात होती. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सहाल चाउस यांनी काम पाहिले. आ. आर.टी. देशमुख, बाबुराव पोटभरे, मोहन जगताप, अच्युतराव लाटे, ज्ञानेश्वर मेंडके, श्रीहरी मोरे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
विश्वास सार्थ ठरविणार
निवडीनंतर ‘लोकमत’शी बोलताना सुमन मुंडे म्हणाल्या, माजलगाव शहराच्या विकासासाठी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यात येईल. सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)