विमा रक्कम कर्जात जमा
By Admin | Updated: June 16, 2017 00:50 IST2017-06-16T00:49:46+5:302017-06-16T00:50:18+5:30
पाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत

विमा रक्कम कर्जात जमा
विलास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत. बँकांनी अशी प्रक्रिया केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दहा कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मागील वर्षी शासनाने पीक विम्याचे पैसे कर्जखाती वळती करू नयेत किंवा कपात करू नयेत असे आदेश दिले होते. यंदा शासनाने कर्जमाफी देऊ केल्याने विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याची मागणी आहे.
शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा देण्याच्या उद्देशाने काही बदल करून पंतप्रधान पीकविमा योजना आखण्यात आली.यामध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी असे भाग पाडण्यात आले. पीक कर्ज घेणारा शेतकरी कर्जदार आणि न घेणारा शेतकरी बिगर कर्जदार अशी रचना करण्यात आलेली आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा भरणे ऐच्छिक करण्यात आले तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा बंधनकारक करण्यात आला. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा पीक विमा बँकेने परस्पर भरणा करुन हप्त्याचे पैसे कर्जखाती टाकले. पीक विम्याच्या रकमा विमा कंपनीने बँकांकडे पाठवल्या. बँकानी हे पैसे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केले. वास्तविक गतवर्षी विम्याचे पैसे कर्जात वसूल करु नयेत असे शासनाचे आदेश आहेत. तरीही बॅँका पीक विम्याची रक्कम कर्जखाती वळती करत आहेत. वसुलीबाबत आदेश असल्याचे बॅँक अधिकारी सांगतात. ही रक्कम वळती करु नये अशी मागणी होत आहे.