जन्मठेप सुनावताच आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: October 15, 2016 01:19 IST2016-10-15T01:05:56+5:302016-10-15T01:19:14+5:30
औरंगाबाद : पत्नीच्या खून प्रकरणात न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायालयातच आपल्या मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

जन्मठेप सुनावताच आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : पत्नीच्या खून प्रकरणात न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायालयातच आपल्या मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने न्यायालयही काही वेळ स्तब्ध व स्तिमित झाले. औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयातील तिसऱ्या मजल्यावरील सत्र न्यायालयात शुक्रवारी (दि.१४) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुकेश विश्वनाथ चौधरी (रा. शिगाईत, ता. जामनेर, जि. जळगाव) असे या आरोपीचे नाव आहे. लग्नानंतर त्याने दुसऱ्याच महिन्यात दगडाने ठेचून पत्नी माधुरी हिचा खून केला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी शुक्रवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिक्षा ऐकताच मुकेशने सोबत आणलेल्या ब्लेडने न्यायालयातच स्वत:च्या गळ्यावर सपासप वार केले. पोलिसांनी जखमी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदविला.
हुंड्यासाठी छळ व खून
लग्नात सव्वालाख रुपये हुंडा देऊनही फ्रीज, कूलर व इतर वस्तू दिल्या नाहीत म्हणून माधुरीचा सासरची मंडळी व पती छळ करीत होती. लग्नानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात नक्षत्र पार्क च्या पूर्वेस डोंगराच्या पायथ्याशी मुकेशने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला.
याप्रकरणी मृत माधुरी हिचे वडील भगवान गोविंद पाटील (५२, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार मुकेश चौधरी याच्याशी माधुरी हिचा २० जानेवारी २०१० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर माधुरी ही शिंगाईत येथे सासरच्या घरात सासू, सासरे, दीर व पतीसोबत एकत्र राहत होती. विवाहात माधुरीच्या माहेरच्यांनी १ लाख २१ हजार रुपये हुंडा दिला होता. विवाहानंतर १५ दिवस माधुरीला सासरच्यांनी चांगले वागवले. त्यानंतर मात्र फ्रीज, कूलर व इतर वस्तू पाहिजेत म्हणून माधुरीला टोचून बोलणे, मारहाण करण्याचे प्रकार सासरच्यांनी सुरू केले. दरम्यान, आरोपी मुकेशला औरंगाबादला नोकरी लागली म्हणून दोघे नक्षत्रवाडी परिसरातील कांचननगर येथे राहण्यासाठी आले. या घरातही सासू-सासरे अधूनमधून येऊन माधुरीचा छळ करीत होते. १५ मार्च २०१० रोजी संध्याकाळी सहा वाजता मुकेश पत्नीला फिरायला घेऊन गेला. मात्र रात्री तो एकटाच परतला. मागच्या बाजूने तो घरात शिरताना शेजारी जयवंताबाई व घरमालक यांनी त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पाहिले. त्यांना पाहताच मुकेशने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केल्यानंतर त्याचे नाटक उघडकीस आले. सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने मुकेश याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सासू, सासरे व दिराला निर्दोष सोडले.