युवा अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:14 IST2017-10-05T18:13:04+5:302017-10-05T18:14:14+5:30
वाळूज एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीत कामाला असलेल्या अभियंत्याने अज्ञात कारणावरुन रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

युवा अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
औरंगाबाद, दि. ५ : वाळूज एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीत कामाला असलेल्या अभियंत्याने अज्ञात कारणावरुन रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास छावणी पुलाजवळ रेल्वेपटरीवर घडली.
आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत अनोळखी युवक मृत होऊन पडलेला असल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक के.डी. भूईगळ, जमादार रामसेवक गुरूंग, बी.के. मिर्झा यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी त्याच्या पॅण्टच्या खिशात त्याचे आधारकार्ड आणि पाकिट सापडले. या आधारकार्डवरून मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
मनोज परमेश्वर फदाट (वय २४,रा. बोरगाव बुद्रुक,ता.जाफराबाद, जि.जालना) असे मृताचे नाव आहे. मनोज हा शिक्षणासाठी सहा ते सात वर्षापूर्वी औरंगाबादेत आला. बजाजनगर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो वाळूज एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीत कामाला होता.
पोलिसांनी मनोजच्या वडिलांना गावी फोन लावून घटनेची माहिती दिली. आणि मृतदेह घाटीतील शवविच्छेदनगृहात दाखल केला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलीस हेड काँन्स्टेबल मोटे यांनी दिली.