रांजणगावात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:58+5:302020-12-17T04:29:58+5:30
वाळूज महानगर : एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१३) रात्री ...

रांजणगावात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
वाळूज महानगर : एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास रांजणगावात घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, अर्चना मारूती वाबळे (२५) ही पती व दोन मुलासह रांजणगावात वास्तव्यास आहे. रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास अर्चना हिने राहत्या घरी छताच्या लोखंडी ॲंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. अर्चना हिने गळफास घेतल्याचे लक्षात येताच बाळासाहेब तुरकणे व आकाश तुरकणे या दोघा पिता-पुत्रांनी अर्चना हिस बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून अर्चना वाबळे हिस रात्री १० वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले हे करीत आहेत.
------------------------
प्रवासी भरण्यावर चालक आपसात भिडले
वाद विकोपाला : ए.एस.क्लब चौकातील घटना
वाळूज महानगर : खासगी वाहनात प्रवासी भरण्यावर दोन चालक आपसात भिडल्याची घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ए.एस.क्लब चौकात घडली. या घटनेत सुशील प्रकाश लोखंडे (३४ रा.तिसगाव परिसर) हा जखमी झाला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सुशील प्रकाश लोखंडे हा रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आपली टाटा मॅजिक (एम.एच.२०, ए.वाय.५८९४) घेऊन ए.एस.क़लब चौकात उभी करुन प्रवासी भरत होता. यावेळी अॅपेरिक्षाचा (एम.एच.२०, इ.एफ.८२०४) चालक रतन सौदागर याने सुशील याच्या वाहनातील प्रवासी खाली उतरवून आपल्या रिक्षात बसवू लागला. हा प्रकार पाहताच सुशील याने त्यास मज्जाव केल्यामुळे रतन सौदागर याने त्यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरूवात केली. या दोघातील वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या रतन याने रस्त्यावरील दगड फेकून मारल्यामुळे सुशील याचे डोके फुटून तो जखमी झाला. या दोघात सुरु असलेल्या भांडणाचा आवाज ऐकून चौकात उभ्या असलेल्या अनिल गाडे, संतोष काळे व चंदू जोगदंड यांनी मध्यस्थी करुन रतन याच्या तावडीतून सुशील याची सुटका केली. या मारहाण प्रकरणी सुशील लोखंडे याच्या तक्रारीवरुन रतन सौदागर याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------