कृषी सहाय्यकास मारहाण

By Admin | Updated: June 28, 2014 01:18 IST2014-06-27T23:56:38+5:302014-06-28T01:18:30+5:30

हिंगोली : गारपिटीचे अनुदान का मिळवून दिले नाही? असे म्हणून काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक प्रकाश त्र्यंबकराव कावरखे (वय ५२) यांना मारहाण केल्याची घटना हिंगोली तहसील कार्यालयात

Suicide of Farm Assistant | कृषी सहाय्यकास मारहाण

कृषी सहाय्यकास मारहाण

हिंगोली : गारपिटीचे अनुदान का मिळवून दिले नाही? असे म्हणून काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक प्रकाश त्र्यंबकराव कावरखे (वय ५२) यांना मारहाण केल्याची घटना हिंगोली तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून १४ आरोपींना अटक केली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कावरखे यांच्याकडे तीन महिन्यांपासून गारपीटसंदर्भाने शासकीय योजनेचे काम सुरू होते. या कामासाठी सिरसम सर्कलमधील एकुण आठ गावे त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यापैकी एक असलेल्या हिरडी येथील संजय थोरात याने शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता कावरखे यांना फोन केला. तुम्ही तहसील कार्यालयात या, तुमच्या सोबत बोलायचे आहे. असे त्याने सांगितले. त्यानंतर सकाळी ११ वाजता कावरखे त्या ठिकाणी पोहोचले असता तहसील कार्यालयात मोठा जमाव दिसून आला. त्यापैकी रमेश थोरात याने आमच्या गावाच्या लोकांचे गारपिटीचे पैसे द्या असे म्हणून तो मोठ्याने ओरडू लागला. त्यावर कावरखे यांनी शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ व झालेले नुकसान याचा अंदाज घेतल्यानंतर बनविलेल्या बिलानुसार तहसील कार्यालयातून त्याचे पैसे आले आहेत. गारपिटाच्या अनुदानाची यादी तलाठ्याकडे आहे. त्यात माझी काहीही भूमिका नाही, असे स्पष्ट केले; परंतु जमावातील लोकांनी काहीही ऐकूण न घेता लाथाबुक्क्याने कावरखे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तहसील कार्यालयातील तलाठी धाबे, कृषी सहाय्यक आर.के जाधव, संजय राठोड, आर. एन. कावरे, विठ्ठल जाधव, प्रकाश पांढरे आदींनी भांडणाची सोडवासोडव करून कावरखे यांना वाचविले.
याप्रकरणी कावरखे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, १४३, १४९, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला असून १४ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
यात आरोपी शिवहरी विठ्ठल लांडगे, रामेश्वर अर्जुन काकडे, विश्वनाथ नारायण लांडगे, मोहन यशवंतराव थोरात, किशन मोहन थोरात, देवबा राघोजी पठाडे, रामेश्वर यशवंतराव थोरात, ज्ञानबा लिंबाजी थोरात, दिगंबर दत्तराव लांडगे, पांडुरंग भगवान थोरात, रामेश्वर सीताराम चवरघोडे, गजानन जयवंता चवरघोडे, मारोती दगडू थोरात, निवृत्ती बबन थोरात (सर्व रा. हिरडी) यांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने या मारहाणीच्या घटनेचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of Farm Assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.