जिल्ह्यातील उसाची काश्मीरपर्यंत गोडी

By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:12+5:302020-12-04T04:11:12+5:30

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- ...

Sugarcane from the district to Kashmir | जिल्ह्यातील उसाची काश्मीरपर्यंत गोडी

जिल्ह्यातील उसाची काश्मीरपर्यंत गोडी

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- काश्मीरपर्यंतच्या लोकांना गोडी लागली आहे. हंगामात दररोज १०० टनांपेक्षा अधिक ऊस राज्यासह परराज्यात पाठविला जातो.

साखर कारखान्यापेक्षा टनामागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आता रसवंतीलाच ऊस देत आहेत. फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांतील हजारावर शेतकरी या ऊस लागवडीकडे वळले आहेत. याचे श्रेय जाते ममुराबादचे (ता.खुलताबाद) रहिवासी राउफ पटेल यांना. पटेल हे व्यापारी. येथील उसाला जम्मू-काश्मीरपर्यंतची हक्काची बाजारपेठ मिळून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी सांगितले ८-१० वर्षांपूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. तेव्हा एका रसवंतीचालकाने विश्वास दाखवत ऊस पुरवठ्याचे काम दिले. गावातील शेतकऱ्यांकडून २० टन ऊस घेऊन तो रसवंतीगृहाला विकला. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. हंगामात दररोज १०० ते १२५ टन ऊस राज्य-परराज्यातील ५०० पेक्षा अधिक रसवंत्यांना आता मी पाठवितो. शेतकऱ्यांना ऊस शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना बेनं उपलब्ध करून देणे, ऊस आल्यावर त्याची तोडणी करणे व शेतकऱ्याला शेतातच पैसे उपलब्ध करून देऊ लागलो. उसाच्या भावानुसार शेतकऱ्यांना दीड ते अडीच लाखांदरम्यान एकरी उत्पन्न मिळत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जानेवारी ते जूनदरम्यान महाराष्ट्र, इंदूर, भोपाळ, रायपूर येथील रसवंतीला ऊस पुरवठा केला जातो. जुलै व ऑगस्टदरम्यान राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब व जम्मू-काश्मीर येथील रसवंतीसाठी ऊस पुरवला जातो. येथील ऊस कमी पडला तर नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील ऊसही काश्मीरपर्यंत पाठविला जातो. पटेल यांच्याकडे काम केलेल्या चौघांनी आता स्वतःचा ऊस पुरवठ्याचा होलसेल व्यापार सुरू केला आहे.

चौकट

अनेकांना मिळाला रोजगार

फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर येथील हजार शेतकरी व ऊस तोडणी करणारे ५०० मजूर, हंगामात २० पेक्षा अधिक मालट्रक व १०० पेक्षा अधिक टेम्पोचालक यांना रोजगार मिळाला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत ऊस तोडणी, वाहतूक व्यापाऱ्यांत १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. साखर कारखान्यापेक्षा टनामागे ४०० ते ५०० रुपये अधिक भाव मिळत असल्याने सुमारे १ हजार शेतकरी उसाकडे वळले आहेत.

Web Title: Sugarcane from the district to Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.