चाळीसगावकडे जाणारी अचानक वाहतूक वळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:53 IST2017-08-22T00:53:33+5:302017-08-22T00:53:33+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड-चाळीसगाव रोडवरील घाटातील दरड कोसळली. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळ्याकडे जाणारी वाहतूक शिऊर बंगला ते नांदगावमार्गे वळविली आहे.

चाळीसगावकडे जाणारी अचानक वाहतूक वळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड-चाळीसगाव रोडवरील घाटातील दरड कोसळली. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळ्याकडे जाणारी वाहतूक शिऊर बंगला ते नांदगावमार्गे वळविली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे तो रस्ता हस्तांतरित केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीबाबत त्यांचीच जबाबदारी होती; परंतु त्यांच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे बांधकाम विभागाने वाहतूक वळविण्यासाठी परिश्रम घेतले.
मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार यांनी सांगितले, पावसामुळे घाटात दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली आहे. देवगाव रंगारी ते शिऊर बंगलामार्गे नांदगाव ते चाळीसगावमार्गे धुळे या मार्गाने वाहतूक वळविली आहे. कन्नड ते चाळीसगाव हा मार्ग जड वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. मार्ग दुरुस्तीपर्यंत याच पर्यायी मार्गाने वाहतूक चालेल.
दरम्यान, एस.टी. महामंडळाने त्यांच्या मध्यवर्ती बसस्थानकाकडून कन्नड ते चाळीसगावमार्गे धुळे व त्यापुढे जाणाºया १६ बसेससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविलेल्या रोडने वाहतूक वळविली आहे. शिऊर बंगला ते नांदगावमार्गे चाळीसगाव ते धुळे एस.टी. धावत आहे.