वाढीव जागांसाठी अचानक फेरतपासणी
By Admin | Updated: July 6, 2016 23:58 IST2016-07-06T23:52:06+5:302016-07-06T23:58:22+5:30
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील १० वाढीव जागांसाठी भारतीय दंत परिषदेतर्फे फेरतपासणी केली जाणार आहे.

वाढीव जागांसाठी अचानक फेरतपासणी
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील १० वाढीव जागांसाठी भारतीय दंत परिषदेतर्फे फेरतपासणी केली जाणार आहे. ही तपासणी बुधवारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ऐन सुटीच्या दिवशी महाविद्यालय सुरू ठेवण्यात आले; परंतु दिवसभर चातकासारखी प्रतीक्षा करूनही पथक आले नाही.
भारतीय दंत परिषदेच्या निरीक्षकांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात केलेल्या तपासणीत विविध त्रुटी आढळल्या. त्यामुळे महाविद्यालयाच्या वाढीव १० जागा कमी करण्याचा प्रस्ताव परिषदेने आरोग्य मंत्रालयास दिला. परिणामी ५० ऐवजी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची नामुष्की ओढवली. परंतु त्यानंतर तात्काळ त्रुटींची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे गत आठवड्यातच येथील विविध सोयी-सुविधांबाबत दिल्लीत आरोग्य मंत्रालयास सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाने आरोग्य मंत्रालय समाधानी झाले आहे. त्यामुळे आता दंत परिषदेतर्फे पुन्हा एकदा फेरतपासणी केली जाणार आहे. त्यासाठी परिषदेचे पथक महाविद्यालयास भेट देणार आहे. हे पथक बुधवारी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे ऐन सुटीच्या दिवशी सकाळी १० वाजेपासून अधिष्ठाता, विभागप्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महाविद्यालयात हजर होते. दुपारी ४ वाजेपर्यंत पथकाची वाट पाहण्यात आली. परंतु पथक आले नाही.