जामवाडी केंद्राची अचानक पाहणी
By Admin | Updated: December 16, 2014 01:04 IST2014-12-16T00:35:53+5:302014-12-16T01:04:23+5:30
जालना : तालुक्यातील जामवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.

जामवाडी केंद्राची अचानक पाहणी
जालना : तालुक्यातील जामवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.
दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या केंद्रीय पथकास बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना केल्यानंतर जिल्हाधिकारी नायक व सीईओ देशभ्रतार यांनी तेथून जवळच असलेल्या या आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यावेळी तेथे आरोग्यसेविकांची उपस्थिती होती. रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही, याविषयीची त्यांनी माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी नियमित केंद्रात येतात का, असा सवाल करून उपलब्ध असलेल्या यंत्रणांची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: रक्तदाबाची तपासणी करवून घेतली.
सदरील आरोग्य केंद्र जामवाडीअंतर्गत असले तरी ते श्रीकृष्णनगर येथे आहे. पूर्वी जामवाडी आणि श्रीकृष्णनगर एकत्र होते. आता दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती असल्याचे उपस्थित काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. केंद्राच्या संरक्षण भिंतीचे काम अद्याप अपुर्णावस्थेत आहे. ते तातडीने करा, अशी सूचना नायक यांनी सीईओंना केली. यावेळी तहसीलदार लबडे उपस्थित होते.