वाळू पट्ट्यांची अचानक तपासणी
By Admin | Updated: May 8, 2014 00:12 IST2014-05-08T00:12:35+5:302014-05-08T00:12:49+5:30
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी परंडा तालुक्यातील चार वाळूपट्ट्यांना अचानक भेट देऊन तपासणी केली.

वाळू पट्ट्यांची अचानक तपासणी
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी परंडा तालुक्यातील चार वाळूपट्ट्यांना अचानक भेट देऊन तपासणी केली. वाळू उपसा करताना अनेक ठिकाणी सर्रास नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे परवानगी नसतानाही काही ठिकाणी वाळू उपशासाठी सक्षम पंपाचा वापर होत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविला आहे. परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूपट्टे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी गुरूवारी सकाळी ६ ते ९.३० या वेळेत तालुक्यातील कौडगाव, बंगाळवाडी, शिराळा आणि वागेगव्हाण येथील वाळू पट्ट््यांना अचानक भेट देवून तपासणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, परंडा तहसीलदार शिवकुमार स्वामी, मंडळ अधिकारी देवकते यांच्यासह अधिकारी, कर्मचार्यांचा समावेश होता. या पथकाने सकाळी सहा वाजल्यापासून प्रत्यक्ष वाळू पट्टे तपासणीला सुरूवात केली असता, काही ठेकेदारांकडून वाळूचा उपसा करताना अनेक नियम डावलले जात असल्याचे समोर आले. वाळूचा उपसा करण्यासाठी सक्षम पंपाचा वापर करण्यास परवानगी नसतानाही त्याचा वापर होताना दिसून आले. सक्षम पंपाव्दारे वाळू उपसा केल्यास पाण्याखालील वाळूचा उपसा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच ही बाब या पथकाने गांभिर्याने घेतली. दरम्यान, याबाबत उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, सदर प्रकरणी भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त होताच संबंधितांविरूद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)