सुदामवाडीच्या शिक्षकाने भरवले ऐतिहासिक नाणी, नोटांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:41 IST2018-02-03T00:40:55+5:302018-02-03T00:41:07+5:30
आजच्या धावत्या युगात काही गोष्टी मागे पडत चालल्या आहेत; पण म्हणतात ना जुनं ते सोनं, अशा पद्धतीने जुन्या गोष्टींना त्यांचे महत्त्व प्राप्त करून देण्याचे आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील मुकुंदराव सोनवणे यांनी केले आहे.

सुदामवाडीच्या शिक्षकाने भरवले ऐतिहासिक नाणी, नोटांचे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : आजच्या धावत्या युगात काही गोष्टी मागे पडत चालल्या आहेत; पण म्हणतात ना जुनं ते सोनं, अशा पद्धतीने जुन्या गोष्टींना त्यांचे महत्त्व प्राप्त करून देण्याचे आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील मुकुंदराव सोनवणे यांनी केले आहे.
सोनवणे यांनी ऐतिहासिक पुरातन नाणी व नोटांचे शाळेत प्रदर्शन भरवले. प्रदर्शनात भारतीय नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, मोगलकालीन नाणी अशा शेकडो नाण्यांचा समावेश होता. या शिवाय जुनी पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, एयर कार्ड तसेच विविध प्रकारच्या जुन्या नोटांचा समावेश होता. हे प्रदर्शन पाहून उपस्थित भारावून गेले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी केले. यावेळी उपसरपंच अनिता सोनवणे, कांतीलाल जगधने, रमेश जगधने, उत्तमराव पवार, राजू सोनवणे, पोलीस पाटील मोहन सोनवणे, प्रभाकर सोनवणे, मच्छिंद्र पठारे, गावातील लहान मुलांसह नागरिक व महिलांनी या प्रदर्शनाला हजेरी लावून सोनवणे यांची प्रशंसा केली. मुख्याध्यापक साईनाथ कवार, एस.आर. जाधव, कमोदकर एम के, मनोज सोनवणे, सुयोग बोराडे, रामदास पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
संग्रह वृत्ती
वाढीस लागते...
अशा प्रदर्शनामुळे मुलांमध्ये संग्रह वृत्ती वाढीस लागते आणि योग्य छंद जोपासण्यासाठी प्रेरणा मिळते तसेच इतिहासाबद्दल माहिती होते.
- सुनील सोनवणे,शिक्षक