दहा सीईओंनी जाणून घेतल्या महिला बचत गटांच्या यशोगाथा
By Admin | Updated: June 22, 2014 00:11 IST2014-06-21T23:35:27+5:302014-06-22T00:11:30+5:30
जालना : राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली.

दहा सीईओंनी जाणून घेतल्या महिला बचत गटांच्या यशोगाथा
जालना : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पथदर्शी स्वरूपात चालणाऱ्या जालना जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या कामकाजाला राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ श्रावण हार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ पे्ररणा देशभ्रतार, रत्नागिरीचे सीईओ शेखर गायकवाड, सोलापूरचे सीईओ चंद्रकांत गुडेवार, नंदूरबारचे सीईओ व्ही.गमे यांच्या चमूने हिस्वन खुर्द येथील जय मल्हार व साईराम महिला स्वंयसहाय्यता गटातील महिला सदस्यांच्या बैठकीला भेट देऊन गटाच्या कामकाजाची पध्दती जाणून घेतली. गटाच्या माध्यमातून गरिबीवर कशी मात करता येते, यासंबंधी महिलांनी विचार व्यक्त केले. सीईओ पथकातील सदस्यांनी महिलांच्या वैयक्तिक प्रगतीविषयी चर्चा केली. याचसोबतच भाटेपुरी येथील सावित्रीबाई महिला ग्रामसंघ येथेसुध्दा पथकाने भेट दिली. ग्रामसंघाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेतली.
अभियानाच्या मुख्य परिचालन अधिकारी लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळचे सीईओ मल्लीनाथ कामशेट्टी, गडचिरोलीच्या सीईओ संपदा मेहता, गोंदियाच्या सीईओ डी.डी. शिंदे, वर्ध्याचे सीईओ उदय चौधरी, दादासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील रामरहिम, भारतमाता, एकता चमेली या महिला स्वयंसहाय्यता गटांना भेटी दिल्या. यावेळी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च, सूक्ष्म ऋण आराखडा याविषयी चर्चा करून समाधान व्यक्त केले. याचबरोबर राजुरेश्वर महिला ग्रामसंघ, राजूर येथे भेट देऊन ग्रामसंघाच्या कामकाजाची पध्दती, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, ग्रामसंघाची भूमिका आदी बाबी जाणून घेतल्या.
सीईओ पे्ररणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाखाली जालना व भोकरदन तालुक्यातील गटविकास अधिकारी जिल्हा व तालुका अभियान कक्षाचे कर्मचारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)