संग्रामनगर येथे होणार भुयारी मार्ग
By Admin | Updated: August 17, 2016 00:55 IST2016-08-17T00:21:43+5:302016-08-17T00:55:32+5:30
औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर येत्या चार महिन्यांत भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उड्डाणपूल उभारल्यानंतर

संग्रामनगर येथे होणार भुयारी मार्ग
औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर येत्या चार महिन्यांत भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उड्डाणपूल उभारल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील रेल्वे गेट बंद करणे आवश्यक आहे; परंतु उड्डाणपूल उभारून दोन वर्षे उलटूनही संग्रामनगर येथील रेल्वे गेट सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे गेट बंद केले जाणार असून या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी भुयारी मार्ग बनविण्यात येईल. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
रेल्वेगेट बंद केल्यामुळे प्रतापनगर, देवानगरी इ. भागांतील नागरिकांनी चार दिवसांपूर्वी रेल्वे रोको करत गेट कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी आंदोलन छेडले होते. दरम्यान या संदर्भात निर्णय घेण्याबाबत यासंदर्भात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, खा.चंद्रकांत खैरे, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. अखिलेश कुमार सिन्हा, राष्ट्रीय महामार्गाचे जिल्हा समन्वयक जे.यू.चामरगोरे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी, रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए.एस.खैरे, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले.
यावेळी संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंग गेटवर चार महिन्यांत भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत आठवड्यातून एक दिवस दुरुस्तीसाठी वगळता रेल्वेगेट सुरू ठेवण्यात येईल.
संग्रामनगर येथील उड्डाणपुलाची रुं दी वाढविणे आवश्यक आहे, असेही सिन्हा म्हणाले. रेल्वे स्टेशनसमोर वाहतूक बेट उभारल्यास वाहतूक स्वनियंत्रित होईल.
यातून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी दिले.
रेल्वे स्टेशन रोडसाठी आगामी आठ दिवसांत जागेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.
तसेच रेल्वेस्टेशन एमआयडीसी, गोलवाडी, लासूर स्टेशन, दौलताबाद, कन्नड, चाळीसगाव रेल्वेगेटवर देखील लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.
मंगळवारी पहाटे गेट खुले होताच आणि भुयारी मार्ग होणार असल्याची माहिती मिळताच प्रतापनगर, देवानगरी, दर्गा रोड, गादिया विहार, मयूरबन कॉलनी, पेशवेनगर, छत्रपतीनगर इ. भागांतील नागरिकांनी जल्लोष केला.
४रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी श्रीमंत गोर्डे पाटील, प्रेम खडकीकर, संदीप कुलकर्णी, संग्राम पवार, योगेश वाणी, प्रशांत पाटील, रवी कवळे, प्रदीप मोरे, सुलोचना राऊत, रजनी महाजन, नंदा सोनाजे, प्रशांत देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.