तीन तहसीलकडून तलाठ्यांचे वेळापत्रक दाखल
By Admin | Updated: July 5, 2014 00:46 IST2014-07-04T23:51:40+5:302014-07-05T00:46:07+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील कामचुकार तलाठ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली नसली तरी सेनगाव, हिंगोली, वसमत तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या व मंडळ अधिकाऱ्यांच्या गावनिहाय भेटीचे वेळापत्रक
तीन तहसीलकडून तलाठ्यांचे वेळापत्रक दाखल
हिंगोली : जिल्ह्यातील कामचुकार तलाठ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली नसली तरी सेनगाव, हिंगोली, वसमत तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या व मंडळ अधिकाऱ्यांच्या गावनिहाय भेटीचे वेळापत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केले.
‘लोकमत’ ने यासंदर्भात नोकरशाहीचे वाभाडे काढणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल प्रशासन हलले, हे विशेष! असे असले तरी कळमनुरी व औंढा नागनाथ तहसीलदारांनी मात्र वेळापत्रक किंवा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सायंकाळपर्यंत सादर केला नव्हता.
ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना व शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना तलाठ्यांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. महिनोमहिने तलाठी नियुक्त सज्जाच्या ठिकाणी जात नसल्याचे तसेच अनेक तलाठी नांदेड, परभणी, अकोला, हिंगोली या शहराच्या ठिकाणी राहून तसेच तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार पाहत असल्याचे ‘लोकमत’ च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले होते. या स्टिंग आॅपरेशनचे शेतकरी व विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. दुसरीकडे कामचुकार तलाठ्यांचे पितळ उघडे पडले.
जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या १५ वर्षांत बहुतांश तलाठ्यांनी त्यांच्या गावभेटीचे वेळापत्रकच तयार केले नव्हते. मनाला वाटेल त्या वेळी ते गावामध्ये जायचे. दोन ते तीन महिने तलाठीच गावामध्ये येत नसल्याने ग्रामस्थांची अडवणूक होत होती. ही बाब समोर आल्यानंतर पहिल्यांदाच ‘लोकमत’ च्या दणक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाचही तहसीलदारांना व तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना कामचुकार तलाठ्यांवर कारवाई करण्याचे तसेच तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक तयार करून सादर करण्याचे आदेश २७ जून रोजी दिले होते.
तब्बल आठ दिवसानंतरही जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राला एकाही अधिकाऱ्याने दाद दिली नसल्याचे वृत्त ४ जुलै रोजी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच सकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मोबाईलवरून खडसावले. त्यानंतर सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वसमत, सेनगाव व हिंगोली तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक सादर केले.
कळमनुरी व औंढा नागनाथ तहसीलदाराने मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे वेळापत्रक सादर केले नव्हते. त्यामुळे हे तहसीलदार अद्यापही झोपेतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. वेळापत्रक तयार झाल्यानंतर आता ग्रामस्थांना वेळेवर कागदपत्रे मिळावीत व त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कडक लेखी सूचना देणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वेळापत्रक वेबसाईटवर टाकणार- पोयाम
जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील तलाठ्यांच्या गाव भेटीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असून, निश्चित केलेल्या दिवशी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी त्या गावामध्ये उपस्थित राहतो की नाही, याचीही पडताळणी महसूलच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम म्हणाले.