पाणबुडी मोटार वाटपात गैरप्रकार
By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-18T23:56:31+5:302014-06-19T00:21:44+5:30
उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये अनुदानावर पाणबुडी मोटार वाटप करण्यात आली आहे

पाणबुडी मोटार वाटपात गैरप्रकार
उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये अनुदानावर पाणबुडी मोटार वाटप करण्यात आली आहे. मात्र सदरील मोटारी वितरित करताना शासन निकष आणि नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची स्पॉट चौकशी करण्याचे आदेश सर्वसाधारण सभेमध्ये देण्यात आले होते. चौकशीअंती विद्युत मोटारी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तत्कालीन समाजकल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दोघांची विभागीय चौकशी तर दोघांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा प्रकार सर्व प्रथम ‘लोकमत’ ने उजेडात आणला होता.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मागासवर्र्गीय शेतकऱ्यांना समाजकल्याण विभागांतर्गत मोटारी वाटप करण्यात येतात. असे असतानाच तुळजापूर तालुक्यात मात्र धनदांडग्या व्यक्तींना मोटारी वाटप केल्याची तक्रारी झाल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. मात्र सुरुवातीच्या दोन्हीही समित्यांनी गोल गोल अहवाल सादर केला होता. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये उस्मानाबाद पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली होती. त्यांनी या सर्व प्रकाराची स्पॉट चौकशी केली होती. चौकशीअंती तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
चौकशीअंती मोटारी वाटप करताना बहुतांश निकष धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सदस्यांच्या आरोपानुसार धनदांडग्यांना मोटारी वाटप केल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे काही जणांना दुबार लाभ दिल्याचेही उघड झाले. तर काहींच्या शेतात विहिरी नसतानाही त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्यात आली. त्यांनी या मोटारी सधन शेतकऱ्यांना विकून टाकल्या.
असे एक ना अनेक प्रकार यातून समोर आले आहेत. त्यावर हे प्रकरण गांभिर्याने घेत जिल्हा परिषदेकडून तत्कालीन समाजकल्याण अधिकारी कुशाल गायकवाड आणि गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.
तर विस्तार अधिकारी (समाजकल्याण) टी.एम. कांबळे आणि कृषी अधिकारी डी.एम. मुळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. हा सर्व गैरप्रकार ‘लोकमत’ ने सर्वप्रथम उजेडात आणून वेळोवेळी पाठपुरावाही केला होता.त्यानंतरच चौकशीचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)
अन्य तालुक्यांचीही चौकशी करा
तुळजापूर प्रमाणेच अन्य तालुक्यामध्येही अशाच प्रकारे धनदांडग्यांनी मोटारी लाटल्याचे बोलले जाते. त्यामुळे या तालुक्यातील मोटारी वाटप प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.