नियोजनाचा विषय : सिल्लोड तालुक्यात कोरोना थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:35+5:302021-04-23T04:06:35+5:30

सिल्लोड : तालुक्यात १ फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत एकूण १,२२० कोविड रुग्ण सापडले आहेत. पैकी ५९५ रुग्ण बरे होऊन ...

Subject of planning: Corona will not stop in Sillod taluka | नियोजनाचा विषय : सिल्लोड तालुक्यात कोरोना थांबता थांबेना

नियोजनाचा विषय : सिल्लोड तालुक्यात कोरोना थांबता थांबेना

googlenewsNext

सिल्लोड : तालुक्यात १ फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत एकूण १,२२० कोविड रुग्ण सापडले आहेत. पैकी ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५९६ रुग्ण विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ७९ दिवसांमध्ये २९ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सिल्लोड शहरात सर्वाधिक २५० रुग्ण असून, ग्रामीणमध्ये चिंचपूर गावात ३२ रुग्ण सापडले आहेत.

सिल्लोड शहरासहित तालुक्यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. यामुळे गंभीर रुग्णाला रेफर करण्याचा सपाटा आरोग्य यंत्रणेने लावला आहे. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयच ऑक्सिजनवर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

सिल्लोड तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविड टेस्टिंग सुरू आहे. याशिवाय प्रत्येक आरोग्य केंद्रात २ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण १३२ गावे आहेत. यातील ८६ गावांमध्ये आजघडीला कोरोनाने पाय पसरविले आहेत. इतर ४६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.

तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ६ आहे, तर अजिंठा येथे ग्रामीण रुग्णालय, तसेच शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, या एकाही केंद्रात व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही, तर शहरातील खाजगी कोविड सेंटरमध्येही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात असलेले एक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी एकही कोविड सेंटर सुरू नाही. केवळ सिल्लोड शहरात एकच दुर्गामाता कोविड सेंटर सुरू आहे. तेथे १२ रुग्ण उपचार घेत आहेत. अजिंठा येथे ५० बेड, शिवना येथे ५० बेडची व्यवस्था आहे. तालुक्यात गेल्या ५ दिवसांपासून कोरोना लस संपली होती. मंगळवारी ६०० लस डोस उपलब्ध झाले. ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १०० लस डोस पुरविण्यात येत आहेत.

चौकट

चिंचपूर गावाचा ग्राउंड रिपोर्ट

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर या गावाची लाेकसंख्या १,८०० आहे. या गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पंधरा दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता. मात्र, आठ दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडला. आजघडीला या गावात ३२ रुग्ण आहेत, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा तपासणीसाठी दाखल असून, ५०० नागरिकांची कोरोना तपासणी केली आहे. गावात मायक्रो कंटेन्मेट झोन केला आहे. हे गाव पालोद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. गावात अद्याप एकाही नागरिकाचे लसीकरण झालेले नाही.

Web Title: Subject of planning: Corona will not stop in Sillod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.