थरांचा थरार कमी; सुरक्षितता महत्त्वाची
By Admin | Updated: August 13, 2014 01:45 IST2014-08-13T01:23:31+5:302014-08-13T01:45:26+5:30
औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुला-मुलींना दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले.

थरांचा थरार कमी; सुरक्षितता महत्त्वाची
औरंगाबाद : उच्च न्यायालयाने सोमवारी १८ वर्षांखालील मुला-मुलींना गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यास व दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले. दहीहंडीत थरांचा थरार कमी होईल; मात्र गोविंदा पथकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आदेश महत्त्वाचे असल्याचे शहरातील गोविंदा पथकांनी व्यक्त केले.
दहीहंडीचा सराव करताना खाली पडून नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल घेत हे आदेश देण्यात आले. दहीहंडीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षात शहरातील विविध भागात दहीहंडी महोत्सव अधिक ग्लॅमरस करण्यावर भर असल्याचे दिसून येत असून दहीहंडीत सात थरांसाठी थरार रंगत आहे. दहीहंडी वेळेत आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी दुपारी महोत्सव सुरू केला जातो. गोविंदांचा जीवन विमा उतरविणे, डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका उपलब्ध राहील, तसेच हेल्मेटची सक्ती, सर्वात वरील गोविंदास सांभाळण्यासाठी हूक लावण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते. सोमवारी देण्यात आलेल्या आदेशामुळे दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षितपणे साजरा होईल, असे शहरातील मंडळाच्या सदस्यांनी म्हटले.
प्रशिक्षणाअभावी अपघात
कोणत्याही प्रशिक्षणाअभावी अनेकांकडून थर रचले जातात. यातूनच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे गोविंदांना प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. मोठी मंडळे दोन ते तीन महिन्याआधी सराव सुरू करतात. बालगोपालांचा काहीसा हिरमोड होईल, असे जय भोले क्रीडा मंडळाचे मनोज संतान्से म्हणाले.
चार थर लागणार
दहीहंडी उत्सवात मानवी थर पाहण्यासाठी नागरिक येतात. २० फूट उंचीच्या मर्यादेमुळे चार थर लागतील. त्यामुळे थर पाहण्याचा उत्साह काहीसा कमी होईल.
गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेटची काळजी घेतली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, असे शहरातील दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.