सब-ठेकेदारांना ५ कोटींचा गंडा
By Admin | Updated: December 8, 2015 00:10 IST2015-12-07T23:53:01+5:302015-12-08T00:10:29+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्त्वावरील ड्रेनेजलाईन (एसटीपी) प्रकल्पात सब-ठेकेदारांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

सब-ठेकेदारांना ५ कोटींचा गंडा
वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्त्वावरील ड्रेनेजलाईन (एसटीपी) प्रकल्पात सब-ठेकेदारांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड कंपनीच्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नुकतीच अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमआयडीसीने बजाजनगरात ड्रेनेजलाईनचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०११ मध्ये घेतला होता. १२ कोटी ६० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार होते. या कामाचे कंत्राट मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड या कंपनीला मिळाले होते. भारत उद्योग कंपनीने हे काम बेलापूर येथील एसडीडब्ल्यूडी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले. एसडीडब्ल्यूने बजाजनगरातील अशोक शिनगारे यांच्या साई ग्रुप फर्मला करार करून हे काम दिले होते. काम सुरू असताना भारत उद्योग कंपनीच्या संचालकांनी परस्पर एमआयडीसीकडून पैसे घेतले. या प्रकल्पाचे काही काम केल्यानंतर साई ग्रुपचे अशोक शिनगारे यांनी भारत उद्योग कंपनीच्या संचालकांकडे बिलासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, संचालकांनी टाळाटाळ केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी शिनगारे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन ५ कोटी १३ लाख ७८ हजार ४८५ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. आयुक्तांनी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला.
मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड या कंपनीचे संचालक सूर्यकांत कुकरेजा, राम झा, राजेंद्र यादव (सर्व रा. नवी मुंबई) व शेख अब्दुल (रा. वाशी नाका, चेम्बूर, मुंबई) या चौघांविरुद्ध १४ आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा नुकताच एमआयडीसी वाळूज ठाण्यात वर्ग करण्यात आला.