सौर दिव्याच्या प्रकाशात केला दहावीचा अभ्यास
By Admin | Updated: June 9, 2015 00:31 IST2015-06-09T00:31:40+5:302015-06-09T00:31:40+5:30
बालाजी बिराजदार , लोहारा शेतातल्या घरात विजेचा पत्ता नाही. तीन किमी अंतर पायी जावून एसटी बस गाठायची आणि लोहाऱ्याला शिक्षणासाठी जायचे. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बिकट.

सौर दिव्याच्या प्रकाशात केला दहावीचा अभ्यास
बालाजी बिराजदार , लोहारा
शेतातल्या घरात विजेचा पत्ता नाही. तीन किमी अंतर पायी जावून एसटी बस गाठायची आणि लोहाऱ्याला शिक्षणासाठी जायचे. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बिकट. अशा परिस्थितीवर मात करीत तालुक्यातील खेडच्या आनंदनगर तांड्यापासून एक किमी अंतरावर राहणाऱ्या प्रतीक्षा लक्ष्मण चव्हाण हिने दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळविले आहेत.
लक्ष्मण चव्हाण हे पत्नी व चार मुलींसह राहतात. त्यांच्या घरात कसलेच शैक्षणिक वातावरण नाही. त्यात घरची अडीच एकर शेती. परंतु, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्न नाही. त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या चारीही मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द मनात ठेवून हे दाम्पत्य कष्ट करीत आहेत. त्यांची पहिली मुलगी पल्लवी हिला दहावीत ८६ टक्के गुण मिळाले असून, आता दुसरी मुलगी प्रतीक्षा हिनेही ८५ टक्के गुण मिळवून आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे जीच केले आहे.
घर शेतात असल्याने प्रतीक्षा ही दररोज शेतातून पायी आनंदनगर तांडा व तेथून लोकमंगल कारखाना असा तीन किमीचा प्रवास करीत. लोकमंगल कारखान्यावरुन बसने लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल शाळेत शिक्षणासाठी यायची. घर शेतात असल्याने विजेची सोय नाही. त्यामुळे अभ्यास करताना अडचण यायची. हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रतीक्षाला सातवीमध्ये सौर उर्जाचा दिवा असलेला कंदील बक्षीस म्हणून मिळाला होता. त्याच दिव्यावर प्रतीक्षाने अभ्यास करुन हे यश मिळविल्याचे सांगितले.
मुलगी असली म्हणून काय झाले, तिला शिक्षण द्यायचेच, अशी जिद्द मनात होती. त्यामुळे हालाखीच्या परिस्थितीतही आम्ही मोलमजुरी करुन मुलीचे शिक्षण पूर्ण करणार आहोत, असे प्रतीक्षाचे वडील लक्ष्मण चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकदा आर्थिक अडचणी आल्या. परंतु, काहीह झाले तरी मुलींना शिक्षण द्या, असे शिक्षक मुकूंद रसाळ नेहमी सांगत होते. वेळप्रसंगी त्यांनी आर्थिक मदतही केली. आमच्या कष्टाचे चिज आमच्या मुली करीत असून, आम्ही मुलींना शिक्षण देणारच आहोत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
प्रतीक्षा चव्हाण म्हणाली की, घरात लाईट नसल्याने अभ्यासाची अडचण निर्माण होत आहे. सौर उर्जाच्या दिव्यावर अभ्यास करावा लागत असून, त्यात बससाठी पायी तीन किमी अंतर गाठावे लागते. त्यासाठी कमीत कमी आनंदनगर तांड्यापर्यंत तरी बस यावी ही इच्छा प्रतीक्षाने व्यक्त करुन आपल्याला पुढे डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त करीत, आपल्याला गोर-गरीबाची सेवा करायची असल्याचे तिने यावेळी सांगितले.