अभ्यासाची सवय अन् गुणवत्ताही वाढेल
By Admin | Updated: November 21, 2014 00:48 IST2014-11-21T00:40:33+5:302014-11-21T00:48:07+5:30
हणमंत गायकवाड / सितम सोनवणे , लातूर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळणे अनिवार्य करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून,

अभ्यासाची सवय अन् गुणवत्ताही वाढेल
हणमंत गायकवाड / सितम सोनवणे , लातूर
९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळणे अनिवार्य करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागणार आहे. तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांचे टेकन आता कमी होत असल्याने थिअरीकडेही विद्यार्थी वळतील. पर्यायाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागेल, असे मत लातूर शहरातील ८७ टक्के शिक्षकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून व्यक्त केले आहे. शिवाय, लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांची अट योग्य असल्याचा कौलही ८७ टक्के शिक्षकांनी दिला आहे.
राज्य शिक्षण मंडळाने ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढविण्यासाठी लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०१६ पासून लागू होणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खराच उपयुक्त आहे का, याची उकल शिक्षकांकडून करण्यात आली. लातूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांची मते सर्वेक्षणाद्वारे जाणून घेतली. लेखी परीक्षेत २० टक्के गुणांची अट योग्य असल्याचा दुजोरा ८७ टक्के, तर योग्य नसल्याचे १३ टक्के शिक्षकांनी म्हटले आहे. या अटीमुळे विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके वाचण्याची सवय लागेल. त्यामुळे गुणवत्ता वाढेल. पूर्वी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांत लेखीचे गुण अधिक केल्यानंतर विद्यार्थी सहज पास व्हायचा. परंतु, पास होण्याच्या या फुगवट्यात गुणवत्ता नव्हती. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेतील गुणांवर पास होता येते, हे विद्यार्थ्यांत रुजल्यामुळे अभ्यासाचा ओढा कमी झाला. आता नव्या निर्णयामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावाच लागणार आहे. या निर्णयामुळे अनुत्तीर्ण होण्याची भीती अजिबात नाही. परंतु, लेखी परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी मंडळाने २०१६ पासून नव्हे, तर चालू वर्षातही केली असती तर हरकत नव्हती, असे मतही शिक्षकांनी नोंदविले. लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडणार नाही, तर गोडी वाढणार आहे असा सकारात्मक विचारही शिक्षकांनी व्यक्त केला.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी थिअरीबरोबर प्रात्यक्षिक महत्वाचे असते. परंतु, ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांत प्रात्यक्षिकाचे साहित्य नसते. तरीही विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जातात. लेखी परीक्षेत १५ गुण घेतले की तो विद्यार्थी पास होतो. परंतु, पुढे पदवी परीक्षेत तो टिकत नाही. त्यासाठी प्रात्यक्षिक आणि थिअरीही महत्वाची आहे. त्यासाठी लेखीतील २० टक्के गुणांची अट योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण पडणार नाही. शिवाय, शिक्षकांना आपला अभ्यासक्रम पूर्ण शिकविण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांवर पास होता येते, असे मत जसे विद्यार्थ्यांचे तयार झाले आहे तसे काही शिक्षकांचेही आहे. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत शिकवणीचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसे. आता हा निर्णय लागू झाल्यानंतर शिक्षकांचीही जबाबदारी वाढणार आहे, अशी प्रांजळ कबुलीही शिक्षकांनी दिली. प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेले गुण लेखी परीक्षेच्या गुणांत अधिक केल्याने विद्यार्थी सहज पास होतात. आता त्यात ही अट नवी आली आहे. तिचे समर्थनच केले पाहिजे.
विज्ञान शाखेत एका विषयासाठी १०० पैकी २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत २० गुण पडल्यास लेखीत १५ गुण घेतले तरी विद्यार्थी पास व्हायचा. परंतु, या निर्णयामुळे आता विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेत २० टक्के गुण घ्यावे लागतील. प्रात्यक्षिकातील पैकीच्या पैकी म्हणजे २० आणि लेखी परीक्षेत कमीत कमी १६ मार्क्स पडले तरच तो विद्यार्थी उत्तीर्ण ठरणार आहे. हा निर्णय योग्य असल्याचे प्राचार्य व्ही.आर. गायकवाड म्हणाले.
विज्ञान शाखेत प्राविण्य मिळविण्यासाठी प्रात्यक्षिक महत्वाचे आहे. प्रयोगातूनच विज्ञान कळते. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेलाही महत्व आणि लेखीलाही महत्व तितकेच दिले पाहिजे. परंतु, मोठ्या महाविद्यालयांत प्रात्यक्षिक घेण्यासाठी प्रयोगशाळा असतात. परंतु, ग्रामीण भागातील छोट्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रयोगशाळांचा आणि साहित्याचा अभाव असतो. तरीही तेथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत चांगले मार्क्स पडलेले दिसतात. आता या निर्णयामुळे त्यांना लेखी परीक्षेची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. प्रात्यक्षिकांच्या गुणांमुळे मुलं उत्तीर्ण होतील. पण गुणवत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे, असे मत प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी व्यक्त केले.
नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षाच नको, असा निर्णय मध्यंतरी झाला होता. हा निर्णय सामान्य कुवतीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायकच होता. परंतु, यात दुसरी बाजू गुणवत्तेवर परिणाम करणारी होती. आता मंडळाने २० टक्के लेखी परीक्षेत गुणांची अट घातली आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने ही अटही महत्वाची आहे. माध्यमिक स्तरावर आणि पदवीस्तरावर प्रात्यक्षिकाचा उद्देश सफल होत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे लेखीत २० टक्के गुणांची अट आवश्यकच आहे. विद्यार्थ्यांच्या डीप नॉलेजसाठी असे बदल आवश्यक आहेत. कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात थिअरी व वर्गाबाहेर सामाजिक ज्ञान दिले पाहिजे. त्यालाच प्रात्यक्षिक म्हटले पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी व्यक्त केले.
प्रात्यक्षिक परीक्षेत सगळ्याच विद्यार्थ्यांना सारखेच गुण दिले जातात. त्यामुळे नुसताच गुणांचा फुगवटा होता. परंतु, गुणवत्ता कमी असायची. आता प्रात्यक्षिक परीक्षेबरोबर लेखी परीक्षेत २० टक्के गुणांची अट घातल्यामुळे वाचनाचीही सवय विद्यार्थ्यांना लागेल आणि लेखी परीक्षेतीलही गुणवत्ता प्रात्यक्षिक परीक्षेइतकी होईल, असे मत राजस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली देशमुख यांनी व्यक्त केले.
आता अभ्यासच...
लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांची अट म्हणजे फार मोठे संकट विद्यार्थ्यांवर आले असे नाही. संबंधित विषयात पास होण्यासाठी पूर्वीपेक्षा फक्त एक गुण लेखी परीक्षेत अधिक घ्यावा लागणार आहे. याच्यापलिकडे हा निर्णय नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढणार नाही की, शिक्षकांवरही. नाही आणि पालकांवरही नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचे जितेंद्र सूर्यवंशी म्हणाले.