विद्यार्थ्यांचे गणवेश बदलणार

By Admin | Updated: June 2, 2016 23:22 IST2016-06-02T23:16:47+5:302016-06-02T23:22:16+5:30

परभणी : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा खाकी पँट व पांढरा शर्ट हा गणवेश बदलला जाणार

Students' uniforms will change | विद्यार्थ्यांचे गणवेश बदलणार

विद्यार्थ्यांचे गणवेश बदलणार

परभणी : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा खाकी पँट व पांढरा शर्ट हा गणवेश बदलला जाणार असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे गणवेश या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय जि़प़च्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी घेण्यात आला़
जि़ प़ उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या अध्यक्षतेखाली जि़प़ची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली़ यावेळी जि़ प़ सीईओ सुशील खोडवेकर, अतिरिक्त सीईओ शिवाजी कपाळे, शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे आदींची उपस्थिती होती़ यावेळी सभापती टेंगसे यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशामध्ये बदल करण्याचा ठराव मांडला़ त्याला सर्व सदस्यांनी बहुमताने मंजुरी दिली़ नवीन गणवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे राहणार असून, फिक्कट बदामी रंगाची पँट व चॉकलेटी रेषा असलेला शर्ट असा नवीन गणवेश राहणार आहे़ गणवेश खरेदीचा अधिकार मात्र शालेय शिक्षण समितीला देण्यात आला आहे़ शिवाय जि़प़च्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्याचा सामूहिक विमा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ जि़ प़ सीईओ खोडवेकर यांनी शिक्षिका व पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्यामुळे सदस्यांनी गोंधळ केला़ त्यामुळे १५ मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले़ खोडवेकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पूर्ववत सभा सुरू झाली़ यावेळी दलित वस्तीतील काही कामांमध्ये बदल करण्यात आले़ तसेच शेळगाव, आर्वी, मरडसगाव, बनवस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली़. जि़प़ शेष निधीतून शेतकऱ्यांना तुषार सिंचन ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच जि़प़च्या अखत्यारित येणाऱ्या चार रस्त्यांची कामे सा़बां़ विभागामार्फत करण्यास मंजुरी देण्यात आली़ ऐनवेळीच्या विषयात १० लाख ५० हजार रुपयांचे फर्निचर, संगणक प्रिंटर साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली़

Web Title: Students' uniforms will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.