अन् परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सैरावैरा धावू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:02 IST2021-04-08T04:02:11+5:302021-04-08T04:02:11+5:30
पैठण : पदवी परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असून, तो थेट कोविड सेंटरमधून परीक्षा देण्यासाठी आला आहे, ...

अन् परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सैरावैरा धावू लागले
पैठण : पदवी परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असून, तो थेट कोविड सेंटरमधून परीक्षा देण्यासाठी आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठान महाविद्यालयात मिळताच परीक्षा केंद्रावर मोठा गदारोळ उडाला. परीक्षा देणारे विद्यार्थी सैरभैरा धावू लागले. अखेर पोलीस घटनास्थळी आले आणि कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्याचा शोध घेतला. हा विद्यार्थी साधे मास्क घालून अन्य विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देत असल्याची गंभीर बाब समोर आली. या घटनेने हॉलमधील अन्य विद्यार्थ्यांनी धसका घेतला असून, या गंभीर प्रकरणास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.
जिल्ह्यात सध्या पदवी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. प्रतिष्ठान महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा देणारे १४५५ विद्यार्थी बुधवारी हजर होते. परीक्षा सुरू होऊन अर्धा तासाचा अवधी होत नाही तोच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती प्रतिष्ठान महाविद्यालयातील मुख्य लिपिक इम्रान पठाण यांना मिळाली. त्यांनी ही गंभीर बाब प्राचार्य डॉ. बी. आर. शर्मा, परीक्षा नियंत्रक डॉ. अपर्णा पाटील यांना सांगितली. महाविद्यालय प्रशासनाने त्या विद्यार्थ्याचा शोध सुरू केला. ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण परीक्षा केंद्रावर पसरल्याने भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थी सैरावैरा धावू लागले.
तोपर्यंत पैठण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे यांचे पथक महाविद्यालयात दाखल झाले. पोलीस निरीक्षक पवार यांनी कोविड सेंटरशी संपर्क साधून पॉझिटिव्ह रुग्णाचे नाव घेतले. त्या विद्यार्थ्याचा शोध सुरू झाला. संबंधित पॉझिटिव्ह असलेला विद्यार्थी शांतपणे परीक्षा देत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तेथून उठवून पेपर लिहिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्याला कोविड सेंटरमध्ये सोडून देण्यात आले. मात्र, तो विद्यार्थी ज्या हॉलमध्ये होता, त्या हॉलमधील अन्य विद्यार्थ्यांनी गंभीर प्रकारचा धसका घेतला आहे.
कोविड सेंटरचा गलथान कारभार
सदर विद्यार्थी हा पैठण कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या दौऱ्याप्रसंगी त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे परीक्षा देण्यासाठी परवानगी मागितली. सर्व प्रकारच्या उपाययोजना व पीपीई कीट घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर प्रमुखांना दिल्या होत्या, असे पॉझिटिव्ह विद्यार्थ्याने महाविद्यालयात सांगितले; परंतु बुधवारी प्रत्यक्षात तो परीक्षेला आल्यानंतर साध्या मास्कवर होता. या प्रकारामुळे पुन्हा एकदा पैठण कोविड सेंटरचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराने संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आम्हाला माहिती दिली नाही
कोविड सेंटरमधून परीक्षेसाठी विद्यार्थी पाठविणार होते. याबाबत कोविड सेंटरने आम्हाला कल्पना द्यायला हवी होती. याबाबत कोणतीही माहिती दिली गेली. नाही तर सदर विद्यार्थ्याची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असती. पॉझिटिव्ह असलेले दोन विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देत आहेत, असे प्रतिष्ठान महाविद्यालयाचे मुख्य लिपिक इम्रान खान पठाण यांनी सांगितले.
पेपर अर्धवट सोडून निघून आलो.
सदर पॉझिटिव्ह असलेला विद्यार्थी वर्गात जोरजोरात खोकलत होता. तो पॉझिटिव्ह असल्याचे समजताच मोठा गोंधळ उडाला. आम्ही पेपर अर्धवट सोडून निघून आलो. वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. असे या वर्गात परीक्षा देणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनी सांगितले.