पोदार शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:19 IST2017-08-11T00:19:31+5:302017-08-11T00:19:31+5:30
: पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थीनींना मागील दोन वर्षापासून छळणाºया आणि लगट करण्याचा प्रयत्न करणाºया एका शिक्षकाचे कृत्य मुलींच्या तक्रारीनंतर समोर आले

पोदार शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थीनींना मागील दोन वर्षापासून छळणाºया आणि लगट करण्याचा प्रयत्न करणाºया एका शिक्षकाचे कृत्य मुलींच्या तक्रारीनंतर समोर आले असून विलास विश्राम काकडे (३६, रा. भोईवाडा) या शिक्षकविरुध्द जवाहरनगर ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या शिक्षकाला शाळेने बुधवारीच शाळेतून काढून टाकले आहे. शिक्षकाच्या विकृत जाचाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींनी मागील दोन वर्षापासून चालू असलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी गुरुवारी दुपारी प्राचार्यांना घेराव घालून या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि कार्यकर्तेही तिथे पोहोचले आणि प्राचार्यांना यासंबंधी जाब विचारत ‘त्या’ शिक्षकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली.
काकडे हा पोदार हायस्कूलमध्ये गणित विषय शिकवतो. आठवी-नववीच्या विद्यार्थिनींसोबत काही ना काही कारण काढून तो जवळीक करण्याचा प्रयत्न करीत असे, शालेय प्रशासनाकडे याविषयी अनेकदा तक्रार देऊनही त्याच्यावर काहीच कारवाई न करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार पालकांनी केली.
विलास काकडे दोन वर्षांपूर्वी पोदार शाळेत रुजू झाला. विद्यार्थिनींना त्यांच्या खासगी गोष्टी विचारणे, त्यांना शाळेबाहेर भेटण्यास सांगणे, पालकांच्या मालमत्तेबद्दल विचारणे, मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर घुटमळणे, लैंगिक चर्चा करण्यास त्यांना उद्युक्त करणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे, वाईट नजरेने बघणे असे विकृत प्रकार तो करीत असे, प्रसंगी गुण कमी देण्याचे अथवा नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनींवर दबाव टाकत असे. असा अनुभव केवळ एका मुलीचा नाही, तर शाळेतील अनेक विद्यार्थिनींना दररोज या छळाला सामोरे जावे लागे; परंतु भीतीपोटी त्या घरी सांगत नसत. एका विद्यार्थिनीने हिंमत करून दोन दिवसांपूर्वी तिच्या काकांना हा सगळा घाणेरडा प्रकार सांगितला. त्यांनी बुधवारी प्राचार्यांकडे याबाबत तक्रार केली. यावेळी त्यांनी विलासला चांगलाच चोपही दिला. त्याला तात्काळ नोकरीवरून काढण्यात आले. हा प्रकार कळताच इतर विद्यार्थिनींनासुद्धा धाडस आले. त्यांनी आपापल्या पालकांना त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. एवढ्या वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना शाळेने तो रोखण्यासाठी काहीच का केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी शेकडो पालक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता शाळेत दाखल झाले. साठ-सत्तर विद्यार्थिनींनी पालकांसमक्ष रडतच विलासच्या दुष्कृत्यांची आपबिती सांगितली.
‘तुम्ही त्या शिक्षकावर गुन्हा नोंदवा, नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू’ असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला. व्यवस्थापनाने मात्र टाळाटाळ करून प्रकरण न वाढविण्याची मागणी केली. ‘शाळेचे नाव खराब होईल या भीतीपोटी किती दिवस प्रकरणे दाबत राहणार’ असे म्हणत पालकांनी प्राचार्यांना घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले.