भूकंपरोधक डोम घरातील वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: November 19, 2015 00:23 IST2015-11-19T00:13:45+5:302015-11-19T00:23:03+5:30
लक्ष्मण मोरे , लोहारा शहरात जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हे भूकंपानंतर बांधण्यात आलेल्या नमुना घरात (सॅम्पल हाऊस) सुरू असून,

भूकंपरोधक डोम घरातील वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल
लक्ष्मण मोरे , लोहारा
शहरात जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हे भूकंपानंतर बांधण्यात आलेल्या नमुना घरात (सॅम्पल हाऊस) सुरू असून, येथे राहणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांना कसल्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
२० बाय २० या आकाराच्या असलेल्या या घरकुलांना ‘डोम’चे घरकूल म्हणून ओळखले जाते. लोहाऱ्यात असे सात डोम असून, यातील तीन डोम हे विद्यार्थ्यांच्या निवासासाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय एक डोम स्वयंपाकासाठी, एक धान्यासाठी तर एका डोममध्ये कार्यालय आणि एक पाण्यासाठी वापरले जाते. सद्यस्थितीत या घरांना चोहोबाजुंनी तडे गेल्याचे दिसते. तसेच भिंतीचे प्लॅस्टर निघून पडल्याने आतील तारा उघड्या पडल्या आहेत. या डोममध्ये वीज आणि भोजन याशिवाय विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही. उपलब्ध स्रानगृहाचीही मोठी दुरवस्था झाली आहे. येथे झोपण्यासाठी ना बेडची व्यवस्था आहे ना सकाळी प्राथर्विधीसाठी शौचालयाची. येथे विद्यार्थ्यांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत असून, थंडीच्या काळात अंघोळीसाठी गरम पाण्याचीही सोय नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी हौदाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, याचीही वेळेवर स्वच्छता होत नसल्याने यात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. शिवाय या हौदाला तोट्याही बसविण्यात आलेल्या नाहीत.
यासंदर्भात वसतिगृहाचे अधीक्षक जी. आर. गवळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येथे केवळ भोजन आणि निवासाची व्यवस्था आहे. शौचालय असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी परिसरात मात्र कुठेही शौचालय आढळून आले नाही. शाळेला सुट्या असल्याने बुधवारी हे डोम वसतिगृह कुलूपबंद होतो.