संस्थेच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट
By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:21:03+5:302014-06-30T00:36:12+5:30
विलास भोसले , पाटोदा संस्थाचालकांच्या वादात राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने इतरत्रच शाळा सुरू केली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाने चार मुलांना पालकांच्या स्वाधीन केले.

संस्थेच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट
विलास भोसले , पाटोदा
संस्थाचालकांच्या वादात राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने इतरत्रच शाळा सुरू केली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाने चार मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. संस्थेतील या प्रकारामुळे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची मात्र नाहक परवड होत आहे.
पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे पाटोदा येथे मूकबधिर निवासी विद्यालय आहे. या संस्थेचे संस्थाध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे बदली अहवाल दिला असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान सदरील राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन तांबा राजुरी येथे एका इमारतीत मूकबधिर शाळा सुरू केली. या संस्थेतील कर्मचारी सोमीनाथ तनपुरे काही पालकांकडे जाऊन विद्यार्थ्यांना तांबाराजुरी येथील शाळेत प्रवेश दिला. हे विद्यार्थी अधिकृत शाळेत न गेल्याने बेलगाव येथील पालक पांडुरंग पिराजी पोकळे व भूतवाडा (ता.जामखेड) येथील छायाबाई नवनाथ केकाण यांनी तनपुरे विरोधात पाटोदा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने चार मूकबधीर विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संस्था सचिव विठ्ठल तांबे यांनीही पाटोदा पोलिसांत तक्रार दिली. बेकायदा शाळा भरविणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. दरम्यान, या संस्थेतील सदस्यांमध्ये असलेल्या मतभेदामुळे मूकबधिर विद्यार्थ्यांची नाहक परवड होत आहे.
पालक गेले न्यायालयात
अनधिकृत शाळा केल्याप्रकरणी समाज कल्याण अधिकारी व पोलिसांना कळविले असल्याचे सचिव विठ्ठल तांबे यांनी सांगितले
न्यायालयाच्या आदेशाने चार मुलांचा ताबा पालकांकडे