विद्यार्थिनींनी आंदोलन केले, प्रशासनाने लक्ष नाही दिले
By Admin | Updated: July 10, 2017 00:32 IST2017-07-10T00:19:59+5:302017-07-10T00:32:32+5:30
मारतळा : डोणवाडा ता़ लोहा येथील विद्यार्थिनींनी रस्ता दुरुस्तीसाठी व गावातील वाळूचे अवैध साठे हलवावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले़

विद्यार्थिनींनी आंदोलन केले, प्रशासनाने लक्ष नाही दिले
उत्तम हंबर्डे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारतळा : डोणवाडा ता़ लोहा येथील विद्यार्थिनींनी रस्ता दुरुस्तीसाठी व गावातील वाळूचे अवैध साठे हलवावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले़ आंदोलनाची दखल प्रशासन घेऊन प्रशासन कारवाई करेल असे अपेक्षित असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारी काहीही हालचाली झाल्या नाहीत़ त्यामुळे अजून किती मरणयातना सोसायच्या, असा संतप्त सवाल विद्यार्थिनींनी केला आहे़
डोणवाडा गाव लोहा तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे़ येथील ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य व्यवसाय़ आपली मुलगी उच्च शिक्षण घ्यावी, चांगल्या हुद्यावर कर्तव्यावर जावी, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते़ यासाठी ते काहीही करायला तयार असतात़ याला अपवाद डोणवाडावासियपण नाहीत़ गावात पाचवी नंतरचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आठ ते दहा कि़मी़ अंतरावर असलेल्या श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला़ या दरम्यान मानव विकास बसही होती़ गोदावरी नदीपात्रात जाणारा असल्याने नायगाव तालुक्यातील बरबडा, टाकळी, अंतरगाव येथील वाळू घाटावरून अवैध वाळू उपसा करून मोठमोठी अवजड वाहने रात्रंदिवस या रस्त्यावर सुरू असतात़ त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खराब व खड्ड्यांचा झाला़ परिणामी मानव विकासची बस राज्य परिवहन महामंडळाने बंद केली़ सावित्रीच्या लेकींना यामुळे जंगलातून पायपीट करणे भीतीदायक झाले़ गावकऱ्यांनी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली़ आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांची एका शिष्टमंडळाने भेट घेऊन रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती़ मात्र प्रशासनासह चिखलीकरांनीही या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी थेट नांदेड गाठून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरही शाळा भरविली़ मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जि़प़चे सीईओ अशोक शिनगारे यांना दिले़ मात्र त्याचीही दखल घेण्यात आली नाही़