‘विद्यार्थ्यां’साठी वाट्टेल ते
By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-01T23:56:50+5:302014-07-02T00:30:40+5:30
निवृत्ती भागवत , शंकरनगर मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे जात असल्यामुळे मराठी शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

‘विद्यार्थ्यां’साठी वाट्टेल ते
निवृत्ती भागवत , शंकरनगर
मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या मागणीमुळे शाळांचे पेव फुटले आहे़ विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे जात असल्यामुळे मराठी शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अस्तित्व टिकविण्यासाठी या शाळा साम,दाम, दंड, भेद नीतीचा वापर करीत आहेत़
पाल्यांची बौद्धिक समता लक्षात न घेता पैशाच्या बळावर त्याला चांगल्यातल्या चांगल्या शाळेत ठेवून डॉक्टर किंवा इंजिनिअर करावा, अशी भावना गेल्या पाच-सहा वर्षांपासून पालक वर्गात वाढीस लागली आहे़ आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रारंभी पाचगणी सारख्या ठिकाणी पालक एलकेजीपासून लाखावर रूपये फी भरून ठेवत असत़ पालकांमध्ये जसजसे इंग्रजी शाळांचे आकर्षण निर्माण झाले तस-तसे काही सेवाभावी वृत्तीने तर काही धंदेवाईक वृत्तीने संस्था चालक पुढे आले़
इंग्रजी शाळा काढल्यानंतर खूप फायदा मिळतो याची जाणीव होताच शहरासह मोठ्या गावात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे इंग्रजी शाळा उदयाला आल्या आहेत़ आॅक्सफर्ड, केंब्रीज, हॉर्वर्डसारख्या गाजलेल्या नावांचा तर संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्यासारख्या संतांच्या व राजा राममोहन रॉय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या समाजकारणी, राजकारणी व्यक्तींच्या नावाने इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत़
काही संस्थाचालकांनी नद्या, ऐतिहासिक स्थळे, लक्ष्मी, सरस्वती, बालाजी, तिरूपती यांच्या नावाने शाळा सुरू केल्या आहेत़ सध्या ५० ते १०० च्या घरांच्या वस्तीत ही इंग्रजी शाळा पाहण्यास मिळत असून एखाद्या गोठ्यात, गोदामात, जुन्या घरात, टीनशेडमध्ये फर्निचरचा अभाव, शैक्षणिक साहित्याचा अभाव असतानाही या शाळा जोरात चालू आहेत़ इंग्रजी शाळांची संख्या दरवर्षी वाढत चालल्यामुळे मराठी शाळांकडे संख्या दरवर्षी वाढत, घटत चालली आहे़ तुकडी नसलेल्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या जि़प़, खाजगी शाळांना प्रत्येक वर्गासाठी किमान ३० विद्यार्थी मिळविणे अवघड होवून बसले आहे़ त्यामुळे खाजगी शाळांचे संस्था चालक शिक्षकांच्या पैशातूनच आॅटो लावणे, गणवेश देणे, वह्या देणे, गोरगरीब पालकांना राशन देणे, कपडे देणे असे अनेक प्रकार करून स्वत:ची संस्था व शिक्षकांची पदे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़
संस्थाचालकांची मनमानी, मुजोरी
काही तुरळक सन्माननीय अपवाद वगळता अनेक शाळांत अप्रशिक्षित शिक्षक ज्यात १०वी, १२ वी, बी़ए़, बीक़ॉम़ बी़एस्सी पदवी उत्तीर्ण- अनुत्तीर्ण उमेदवार ज्ञानदानाचे (?) कार्य करीत आहेत़ या महान कार्यासाठी त्यांना संस्था चालकांकडून दरमहा १५०० ते १० हजार पर्यंत वेतन मिळत आहे़ खेड्यापाड्यात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी शाळांनी जाहिरातीचा भडीमार सुरू केला आहे़ प्रशिक्षित शिक्षक, सर्व सुविधांनी युक्त शाळा, सुंदर व व्यापक परिसर, खेळाचे मैदान, खेळाचे, शैक्षणिक साहित्य आदी उपलब्ध आहे की नाही ते न पाहता पालक डे-स्कॉलर आणि निवासी स्वरुपात आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत़ शासन अशा शाळांना अनुदान देत नसल्यामुळे वरील बाबींकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी संस्थाचालकांची मनमानी व मुजोरी वाढली आहे़