बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Updated: July 19, 2014 00:46 IST2014-07-19T00:29:28+5:302014-07-19T00:46:08+5:30
आंबा चोंढी : वसमत - पांगरा शिंदे या मार्गावरील बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून ही बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी
बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
आंबा चोंढी : वसमत - पांगरा शिंदे या मार्गावरील बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून ही बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे.
आंबा चोंढी रेल्वे स्टेशन येथे पहिली - बारावीपर्यंत शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक खेडेगावातून मुले-मुली शिकण्यासाठी त्या ठिकाणी येतात. या ठिकाणी जवळपास २ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
मरसूळ, मरसुळवाडी, चोंढी तांडा येथील अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखालील व आदिवासी समाजाचे आहेत. त्यांना गोरखनाथ विद्यालय ही एकमेव बारावीपर्यंत शाळा आहे. वाई, आंबा, कोर्टा, पांगरा बोखारे, मरसुळ, मरसूळवाडी, चोंढी बहेरोबा येथील ग्रामपंचायतींनी वसमत- पांगरा शिंदे बससेवा सुरू करण्याबाबतच्या मागणीचा ठराव घेतला आहे. या ठरावाची प्रत वसमतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. दररोज सकाळी सकाळी ७ वाजता व संध्याकाळी ५ वाजता वसमत- पांगरा शिंदे ही बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणीही परभणीच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. त्यावर ही बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते; परंतु अद्याप सेवा सुरू झालेली नाही.
या मार्गावरील आपआपल्या गावातून ये-जा करण्यासाठी या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध नसल्याने खाजगी जीप, आॅटोरिक्षा, मिनी व्हॅन मधून प्रवास करावा लागतो. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बससेवा नसल्याने फावत आहे.
विशेष म्हणजे वसमतचे आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी विशेष बाब म्हणून वसमत - पांगरा शिंदे ही बससेवा सुरू करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाच्या नियंत्रकांना पत्र दिले आहे. (वार्ताहर)
भागीय नियंत्रकांना पत्र
वसमत तालुक्यातील आंबा चोंढी रेल्वेस्टेशन येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध असून परिसरातील अनेक खेडेगावातील जवळपास २ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
वसमत-पांगरा शिंदे मार्गावरील बससेवा बंद पडल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
वाई, आंबा, कोर्टा, पांगरा बोखारे, मरसुळ, मरसूळवाडी, चोंढी बहेरोबा येथील ग्रामपंचायतींनी वसमत- पांगरा शिंदे बससेवा सुरू करण्याबाबतच्या मागणीचा ठराव घेतला आहे.
या ठरावाची प्रत वसमतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली.
दररोज सकाळी सकाळी ७ वाजता व संध्याकाळी ५ वाजता वसमत- पांगरा शिंदे ही बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणीही परभणीच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणून वसमत- पांगरा बससेवा सुरू करण्याबाबत आ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी विभागीय नियंत्रकांना पत्र दिले.