विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

By Admin | Updated: July 1, 2017 00:39 IST2017-07-01T00:38:50+5:302017-07-01T00:39:22+5:30

जालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे.

Student traffic rules dump | विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा, बस व अन्य वाहनांमधून वाहतूक करताना राज्य शासनाने विशिष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र, जालना शहरासह जिल्ह्यात हे नियम धाब्यावर बसवून, विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यातील अनेक वाहने भंगार झाली असून नियमित तपासणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र लोकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघाताच्या घटनांनंतर २०११ मध्ये विद्यार्थी वाहतुकीचे स्वतंत्र धोरण राज्यशासनाने तयार केले. त्यानुसार विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन पंधरा वर्षांपेक्षा जुने नसावे मात्र, हाच नियम डावलून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीतून बाद झालेल्या जुन्या वाहनांना रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात दोनशे पिवळ्या बसेस व शेकडो रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शालेय बस नियमावलीमध्ये बससह नवी ओमनी व इको या व्हॅन, टाटा मॅजिक या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असून ग्रामीण भागात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहतूक केली जात आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी संबंधित शाळेशी वाहतूकदाराला करार करावा
लागतो.
मात्र, अनेक शाळा याबाबत उत्सुक नसल्याने विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक वाढली आहे. आरटीओकडून वेळोवेळी शालेय विद्यार्थी वाहतुकीची तपासणी करणे गरजेचे असतानाही जालन्यात हे काम केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुनाट, धूर ओकणाऱ्या रिक्षांमधून १० ते १५ विद्यार्थी कोंडल्याप्रमाणे बसविण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग दरम्यान दिसून आले. काही शाळांची वाहतूक व्यवस्था नियमानुसार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी भूमिका असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती शाळा प्रशासन ठेवत नाही. पालकांमध्येही नियमावलीबाबत विशेष जागृती नसल्याने अनधिकृत वाहतूक करणाऱ्या मंडळींचे फावते आहे.

Web Title: Student traffic rules dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.