विद्यार्थ्यांकडून सेवा-सुविधांची पोलखोल !

By Admin | Updated: June 15, 2014 00:58 IST2014-06-15T00:26:30+5:302014-06-15T00:58:35+5:30

तामलवाडी : प्रशासनाला गती यावी, पर्यायाने गावातील समस्या गावातच सोडविता याव्यात यासाठी गतिमान प्रशासन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

Student service polarization! | विद्यार्थ्यांकडून सेवा-सुविधांची पोलखोल !

विद्यार्थ्यांकडून सेवा-सुविधांची पोलखोल !

तामलवाडी : प्रशासनाला गती यावी, पर्यायाने गावातील समस्या गावातच सोडविता याव्यात यासाठी गतिमान प्रशासन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महसूल व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी रात्री तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी या सरहद्दीवरील गावात मुक्कामी होते. ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या स्वत: मांडाव्यात यासाठी सीईओ रावत यांनी ७ टीम तयार करुन समस्या ऐकल्या. मुले कुठल्याही परिस्थितीत सत्य बोलतात याचा अनुभव रावत यांनी घेतला. आकाश जाधव या विद्यार्थ्याने शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची अक्षरश: पोलखोल केली. या विद्यार्थ्याने मांडलेल्या समस्यांनी संबंधित विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
देवकुरुळी हे तसं अडवळणावरीलच. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सरहद्दीवर वसलेलं. जेमतेम तीनशे ते सव्वातीनशे कुटुंबसंख्या. एरव्ही एखादा प्रश्न अथवा समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या गावकऱ्यांच्या दारी शुक्रवारी रात्री अख्खं प्रशासन डेरेदाखल झालं. ७ वाजता सीईओ सुमन रावत यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांना बोलतं करण्यासाठी रावत यांनी आरोग्य, स्वच्छता, नरेगा, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, गावचे प्रश्न आणि शालेय विद्यार्थ्यांची टीम तयार केली. या प्रत्येक टीमचे प्रमुख हे ‘एचओडी’ (विभागप्रमुख) होते. शालेय विद्यार्थ्यांच्या टीमच्या प्रमुखांची जबाबदारी स्वत: रावत यांनी घेतली आणि विद्यार्थ्यांच्या गराड्यात जावून बसल्या अन् त्यांना बोलतं केलं.
यावेळी आकाश जाधव समस्या मांडण्यासाठी उभा राहिला. सर्वप्रथम शैक्षणिक समस्यांबाबत बोलताना त्याने अक्षरश: शिक्षण खात्यांच्या अधिकाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ आणली. ‘मॅडम, येथील शाळेतील मास्तर सकाळी शाळेत आल्यानंतर डबा खावून झोपा काढतात. तसेच संगणकावर पत्ते खेळत बसतात, असे सांगताच संबंधित अधिकाऱ्यांना घाम फुटला. त्यानंतर मनरेगाच्या प्रश्नावरही आकाश जाधव बोलला. ‘मॅडम, ग्रामपंचायतीच्या फलकावर नरेगाची माहिती दिली आहे. मात्र ती फलकापुरतीच मर्यादित राहिली. ना सरपंचांनी ना ग्रामसेवकांनी लोकांमध्ये जनजागृती केली. ग्रामसभा तर कधी होतात याचा पत्ताही लागत नाही. मेंबरही बैठकीला उपस्थित नसतात. गावाच्या विकासाचं कोणालाच काही देणं-घेणं नाही, असं जाधव म्हणाला. आरोग्य केंद्रातही कर्मचाऱ्याचे पद रिक्त आहे. त्यामुळे लोकांना खाजगी दवाखान्याचे उंबरठे झिजवावे लागतात. जाधव याने मांडलेल्या या प्रश्नांमुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि गावपुढाऱ्यांचे चेहरेही बघण्यासारखे झाले होते.
आकाश जाधव या विद्यार्थ्याने गावच्या समस्येवर बोलण्याचे धाडस दाखविल्याने रावत यांनी त्याच्या या धाडसाला दाद दिली. एवढेच नाही तर त्याचा फेटा बांधून सत्कारही केला. यावेळी अन्य विषयावरही चर्चा झाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी महिलांनी गावामध्ये दारुबंदी करण्यासंदर्भात मागणी केली. त्यावर रावत यांनी उत्पादन शुल्क विभागाला लागलीच निर्देशित केले. तसेच गाव हागणदारीमुक्त करा म्हणजे वेगवेगळ्या योजना राबविण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्या म्हणाल्या. सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला कार्र्यक्रम जवळपास ११ वाजेपर्यंत चालू होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे, तहसीलदार काशीनाथ पाटील, पाणीपुरवठा विभागाचे दशरथ देवकर, उपसरपंच कुमार नवगिरे, मंडळ अधिकारी विजय कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, तानाजी जाधव, विस्तार अधिकारी पी.पी. साळुंके, आरोग्य अधिकारी नामदेव धर्माधिकारी, शिवाजी गवळी, पाटबंधारे विभागाचे व्ही.आर. साळुंके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन निर्मल भारत अभियानचे रमाकांत गायकवाड तर आभार मेघा घोळवे यांनी मानले. (वार्ताहर)
उपक्रमाचे कौतुक
सीईओ रावत यांनी विविध गट तयार करुन गावच्या समस्यांवर ग्रामस्थांना बोलते केले. त्यामुळे ज्या महिला, पुरुष कधीच व्यासपीठावरुन बोलले नव्हते अशा मंडळींनीही धाडस दाखविले. ग्रामस्थ बोलते झाल्याने वेगवेगळ्या समस्या समोर आल्या. त्यांच्या या कल्पनेचे ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच सीईओंनी हा उपक्रम आठवड्यातून किमान दोन गावात राबवावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पुढारी गेले कुणीकडे?
अख्खं प्रशासन गावात दाखल होवून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहे. जे प्रश्न गावस्तरावर सोडविण्यायोग्य आहेत. त्यांचा जागेवर निपटारा केला जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र जनतेचा कैवारी म्हणवून घेणारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य या कार्यक्रमात कोठेच दिसत नाहीत, अशी खंत काही सुजान नागरिकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
ग्रामसेविका गैरहजर
देवकुरुळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मोरे या बैठकीला गैरहजर होत्या. विशेष म्हणजे त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता. त्यामुळे बैठकीची तयारी विस्ताराधिकाऱ्यांना करावी लागली. सदर कर्मचाऱ्यावर सीईओ काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
महिला ग्रामसभा नाही
ग्रामसभेच्या अगोदर एक दिवस महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आजवर महिलांसाठी एकही ग्रामसभा झालेली नाही, अशी तक्रार उपस्थित महिलांनी सीईओ सुमन रावत यांच्याकडे केली. त्यानंतर रमाकांत गायकवाड यांनी शौचालयाचे महत्व आणि त्याचे फायदे ग्रामस्थांना सांगितले.

Web Title: Student service polarization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.