मानव विकासमुळे विद्यार्थिनींची वाट झाली सुकर
By Admin | Updated: August 19, 2014 02:13 IST2014-08-19T01:37:25+5:302014-08-19T02:13:32+5:30
देवगावफाटा : ज्या गावातील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी बस नाहीत अशा देवगाव, चिकलठाणा, मोरेगाव परिसरासह सेलू तालुक्यातील विद्यार्थिनींना

मानव विकासमुळे विद्यार्थिनींची वाट झाली सुकर
देवगावफाटा : ज्या गावातील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी बस नाहीत अशा देवगाव, चिकलठाणा, मोरेगाव परिसरासह सेलू तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकास उपक्रमांतर्गत सायकलचा लाभ मिळाला असल्यामुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर झाली आहे़
देवगाव येथील नखाते विद्यालयात बोरकिनी येथून (४ किमी), चिकलठाणा येथील नेताजी विद्यालयातील ३६ विद्यार्थिनी, रायपूर, निरवाडी, चिकलठाणा खु़ येथून तर मोरेगाव येथील पांडुरंग विद्यालयातील ४७ विद्यार्थिनी साळेगाव, खेर्डा, खादगाव, खादगाव सोनवटी शाळेत दररोज पायी येत होत्या़
या विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे घर ते शाळा हा ५ किमीचा प्रवास दररोज पायी करावा लागत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता़ गट शिक्षणाधिकारी एस़ पी़ कुलकर्णी व समन्वयक विषयतज्ज्ञ भुजंग थोरे यांनी तालुक्यातील विद्यार्थिनंीना त्यांच्या शाळेत जाण्यासाठी मानव विकास अंतर्गत बसचे नियोजन केले़ त्यानंतर ज्या गावांत बस जात नाही अशा गावांचा आढावा घेतला़
मानव विकास कार्यक्रमांतर्गत आठवी ते बारावीतील २८८ विद्यार्थिनींचा सायकलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला़ त्यापैकी बँकेत खाते उघडलेल्या २४५ विद्यार्थिनींच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये वर्ग केले़ या पैशातून विद्यार्थिनींनी सायकल खरेदी केल्या़ यानंतर एक हजार रुपये विद्यार्थिनींच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
या विद्यार्थिनींनी आता दररोज सायकलवरून ये-जा करू लागल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़ सायकल मिळाल्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याची भावना पांडुरंग विद्यालयातील प्रतीक्षा डोईफोडे हिने प्रतिक्रिया दिली़ (वार्ताहर)