शेतकरी संघटनेमध्ये संघर्षाचे वारे
By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-22T23:31:41+5:302014-11-23T00:24:57+5:30
जगदीश पिंगळे , बीड समान काम अन् समान वेतन आणि ऊसाला रास्त भाव या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर संघर्ष यात्रा काढणार आहेत.

शेतकरी संघटनेमध्ये संघर्षाचे वारे
जगदीश पिंगळे , बीड
समान काम अन् समान वेतन आणि ऊसाला रास्त भाव या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर संघर्ष यात्रा काढणार आहेत.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास ‘लोकमत’ शी बोलतांना म्हणाले, ऊसाला ३५०० भाव द्यावा आणि समान काम समान वेतन ही आमची मुख्य मागणी आहे. समान काम समान वेतन, या नियमाची पायमल्ली सतत होत गेली आहे. हार्वेस्टर मशिनला प्रति टन ५२५ रू. दिले जातात तर मजुराला फक्त १९० रुपये. ही तफावत गेल्या अनेक वर्षापासून आहे. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी येथून २५ नोव्हेंबर रोजी ऊसउत्पादक संघर्षयात्रा निघणार आहे. ती मराठवाडयातील सर्व जिल्ह्यातून जाणार असून १२ डिसेंबर रोजी हुतात्मा बाबूगेनू स्मृतीदिनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर समारोप आहे. कापसाला प्रतिटन ७००० रुपये भाव मागणाऱ्यांनीच सत्तेत आल्यानंतर ३७०० रुपये भाव घोषित केला. हे कसे असा सवालही यावेळी उपस्थित केला. या संघर्ष यात्रेत साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी मजूर हे सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले.
राज्यात यंदा साधारण २०५ कारखान्यांपैकी ११० कारखाने सुरू आहेत. ऊसाच्या अंतिम खरेदीवर ४ टक्के कर शासनाने माफ केला आहे. त्यामुळे ८०० कोटी रूपये कारखानदाराकडे उपलब्ध होतील असेही आपेट म्हणाले. शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पिसुरे म्हणाले, २८ नोव्हेंबर रोजी उमापूर येथे संघर्ष यात्रा आल्यानंतर सभा होईल.
कऱ्हाड येथील परिषदेत पहिला हप्ता ३५०० रू द्यावा, सी. रंगराजन समितीच्या शिफारसी जशाच्या तशा लागू करा, हार्वेस्टरप्रमाणे मजुराना वेतन द्या, शेतमालाचा भाव ठरविण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करा हे ठराव संमत झाले. महाराष्ट्र राज्य शेतमाल भाव समितीने केलेल्या शिफारसी आणि केंद्र शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत यातील तफावतीची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी हा कळीचा मुद्दा आहे असे आपेट म्हणाले.