किनवटमध्ये भाजपची अस्तित्वासाठी धडपड

By Admin | Updated: June 29, 2017 00:28 IST2017-06-29T00:27:35+5:302017-06-29T00:28:47+5:30

किनवट : किनवट तालुक्यावर राष्ट्रवादीचे आ़प्रदीप नाईक यांची मजबूत पकड आहे़ दुसरीकडे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी केवीलवाणी धडपड करीत आहे़

The struggle for the existence of the BJP in the shore | किनवटमध्ये भाजपची अस्तित्वासाठी धडपड

किनवटमध्ये भाजपची अस्तित्वासाठी धडपड

गोकुळ भवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : किनवट तालुक्यावर राष्ट्रवादीचे आ़प्रदीप नाईक यांची मजबूत पकड आहे़ दुसरीकडे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी केवीलवाणी धडपड करीत आहे़ माजी आ़ भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महासंघाचे अस्तित्व बऱ्यापैकी आहे़
एके काळी काँग्रेस पक्ष तालुक्यात सत्ताधारी होता़ सत्ता नसल्यामुळे सध्या या पक्षाला उतरती कळा लागली़ त्यात अंतर्गत गटबाजीही आली़ अंतर्गत गटबाजीने काँग्रेसला पुरते नामोहरण करून सोडले़ पक्षवाढीसाठी कोणीही झटत नाही़ काही नेते केवळ पांढरा ड्रेस घालून स्वत:ला मिरवितात़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावावर कसेबसा हा पक्ष तालुक्यात तग धरून आहे़ अशोकरावांनी लक्ष घातल्यास पुन्हा काँग्रेस तालुक्यात भरारी घेवू शकते, ही वस्तुस्थिती आहे. भाजपाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही़ माजीमंत्री डी़ बी़ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने तालुक्यात अनेक वर्षे बऱ्यापैकी कामगिरी केली होती़ डी़बी़ पाटील यांचे सध्याचे अस्तित्व नावालाच आहे़ केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असतानाही सत्तेचा लाभ भाजपा कार्यकर्त्यांना अद्यापही उठविता आला नाही़ भाजपालाही अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे़ डी़बी़ पाटील, सुधाकर भोयर, अशोक पाटील सूर्यवंशी यांचे अंतर्गत गट असल्याने या पक्षाला तालुक्यात विस्तारण्याची मोठी संधी असतानाही प्रभावी कामगिरी अद्यापही करता आली नाही़ भाजपा नेते अशोक सूर्यवंशी सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत असताना पक्षातील इतर त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत़
दुसरीकडे आ़प्रदीप नाईक यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा बाजी मारली़ त्यांच्याकडे विकासाचा दृृष्टिकोन असल्याने मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठविले़ तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात सुटल्या आहेत़ सध्यातरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच बॉस बनला आहे़ दरम्यान, तालुक्यात शिवसेनाही आहे़ मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदी पक्षही आहेत.़ एखाददोघा पक्षाचा अपवाद सोडला तर सर्व कागदावरच आहे़ तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे़ तसा प्रयत्न होत नाही़ सर्व एकत्र आले तर जिल्ह्याचा प्रश्न किंवा तत्सम इतर कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आ़ प्रदीप नाईक यांनीच पुढाकार घ्यावा, असे झाल्यास तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, हे नक्की.

Web Title: The struggle for the existence of the BJP in the shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.